कसं होणार जळगावच ! उड्डाणपुल अर्धा बांधला गेला, तरी पूल ‘वाय’ किंवा ‘टी’ आकाराचा हवा हे ठरेणा   

कैलास शिंदे | Thursday, 21 January 2021

शिवाजीनगर पुलाच्या ‘टी’ आकारास जनतेचा विरोध झाला. या ठिकाणच्या रहिवाशांनी त्याला विरोध केला. त्याविरोधात आंदोलन केले.

जळगाव : ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास’ अशी उक्ती प्रसिद्ध आहे. शिवाजीनगर पुलाच्या कामाबाबत सध्या तरी हीच परिस्थिती आहे. मक्तेदारांकडून पुलाच्या कामास विलंब होत असताना, दुसरीकडे पुलाचा आकार ‘वाय’ की ‘टी’ करायचा, याबाबत प्रश्‍नचिन्ह कायम आहे. अद्यापही पुलाच्या आकाराचा नकाशा निश्‍चित न झाल्यामुळे जनतेच्या मनात कामाबाबत संशय निर्माण झाला आहे. 
 

आवर्जून वाचा- एका मताची जादू चालली; भाजपकडे येणारी ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे गेली
 

शिवाजीनगर पूल बांधकामापासूनच त्यांच्या रचनेबाबत वाद आहे. प्रारंभी शिवाजीनगर पुलाचा ममुराबाद रस्त्याकडे एक मार्ग करण्यात आला होता. तसा नकाशा तयार करण्यात आल्याचे सागंण्यात येत होते. त्यानंतर या पुलाचा ‘टी’ आकार करण्यात आला. या पुलाचा मार्ग अमर चौकमार्गे टी. टी. साळुंखे चौकात करण्यात आला होता. त्यांचा नकाशाही करण्यात आला. त्याला मंजुरीही देण्यात आली होती. 

Advertising
Advertising

‘टी’ आकारास जनतेचा विरोध 
शिवाजीनगर पुलाच्या ‘टी’ आकारास जनतेचा विरोध झाला. या ठिकाणच्या रहिवाशांनी त्याला विरोध केला. त्याविरोधात आंदोलन केले. त्या वेळी तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले. मात्र, त्या वेळी ‘टी’ आकारावर महामार्ग विभाग ठाम होता. मात्र, राज्यात सत्तांतर झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले. गुलाबराव पाटील यांच्याकडे पालकमंत्रिपद आले. जनतेने पुन्हा आंदोलन करून विद्यमान पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी जनभावना लक्षात घेऊन त्यांनी पूल ‘एल’ आकारात करण्याचे मान्य केले. त्यानुसार कामही सुरू झाले. 

आवश्य वाचा- 
 

पूल ‘टी’ आकारातच करावा 
पुलाच्या आकाराबाबत अद्यापही प्रश्‍नचिन्ह आहे. मात्र, महामार्ग विभागाने ‘एल’ आकारात काम सुरू केले आहे. पर्यायी वाहतूक शिवाजीनगर भागातील लाकूड पेठ परिसरातून वळविली आहे. मात्र, पूल नक्की होणार तरी कसा, याबाबत आता महामार्ग विभागही निश्‍चित सांगण्यास तयार नाही. ‘एल’ आकारातील पूल केल्यास त्याचा शिवाजीनगरातील नागरिकांना फारसा फायदा होणार नाही. त्यामुळे हा पूल ‘टी’ आकारातच करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र, हे काम तातडीने करण्यात यावे, अशीही जनतेची मागणी आहे. 

लाकूडपेठ भागातूनही वाहतुकीस विरोध 
पुल ‘एल’ आकाराचा झाल्यास शिवाजीनगरातील लाकूड भागातूनच कायम वाहतूक सुरू राहील. हा मार्ग रहदारीचा आहे. या भागातून अवजड वाहने जाणेही कठीण आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे नागरिकांचा या भागातून जाणाऱ्या वाहतुकीस विरोध आहे. त्यामुळे महामार्ग विभागाने पुलाचा नकाशा निश्‍चित करून पूल ‘टी’ आकाराचा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

शिवाजीनगर पुलाच्या ‘एल’ आकाराचा कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे पुलाचे काम ‘टी’ आकारातच करण्यात यावे. याबाबत आपण महामार्ग विभागाकडे मागणीही केली आहे. 
-नवनाथ दारकुंडे, नगरसेवक  
 

 

 

संपादन- भूषण श्रीखंडे