सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांचा पडदा कायमचा ‘ऑफ’ 

singal screen cinema
singal screen cinema

जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्व‍भूमीवर तब्बल तीन महिने लॉकडाउनमध्ये गेल्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, त्यातून चित्रपटगृहांना दिलासा मिळण्याची अद्यापही शक्यता नाही. दुर्दैवाने त्यामुळे सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांना सर्वाधिक फटका बसला असून, ते कायमस्वरूपी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील उरल्यासुरल्या वीस- पंचवीस चित्रपटगृहांमधील शेकडो कामगारांना या लॉकडाउनने देशोधडीला लावले आहे. 
एखादा नवा अथवा बिग बजेट चित्रपट झळकला, की कधीकाळी चित्रपटगृहांच्या तिकीट खिडक्यांवर रसिकांच्या उड्या पडायच्या. ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’साठी चित्रपटप्रेमी अक्षरश: तुटून पडायचे. ‘ब्लॅक’ही मोठ्या प्रमाणात व्हायचे.. ते दिवस गेले अन्‌ चित्रपटगृह ओस पडू लागले. मल्टिप्लेक्स आलेत आणि सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांची उतरती कळा सुरू झाली. 

धरलेली तगही अंतिम टप्प्यात 
अशात मार्चपासून कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. महाराष्ट्रात १६ मार्चपासून चित्रपटगृह बंद आहेत. २४ मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन सुरू झाल्याने देशभरातील चित्रपटगृह बंद आहेत. १ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. मात्र त्यातून चित्रपटगृहांना वगळले. ते कधी सुरू होतील, याची शाश्‍वती नाही. त्यामुळे कशीबशी तग धरून थोडाफार व्यवसाय करणारे सिंगल स्क्रीन चित्रपटगृह आता कायमस्वरूपी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. 

कोट्यवधींचा फटका 
सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांना या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका बसला. जळगाव शहरात राजकमल, रिगल, मेट्रो आणि अशोक हे चार सिंगल स्क्रीन चित्रपगृह आहेत. जिल्हाभरात असे २० थिएटर आहेत. प्रत्येक चित्रपटगृहाला या लॉकडाउनमुळे किमान २५ लाखांचा असा जिल्ह्यात ५० कोटींचा फटका बसल्याचे सांगितले जाते. 

पाचशेवर कामगार बेरोजगार 
एका सिंगल स्क्रीन चित्रपटगृहात सरासरी १८ ते २० कामगार काम करतात. शिवाय, चित्रपटगृहाबाहेर खाण्या-पिण्याचे स्टॉल, पानटपरी आदी पाच-सात लोक व्यवसाय करतात. असे जवळपास पाचशेपेक्षा अधिक कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या तीन-चार हजार कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

दृष्टिक्षेप 
जळगावातील चित्रपटगृह : ०६ 
सिंगल स्क्रीन : ०४ 
मल्टिप्लेक्स : ०२ 
जिल्ह्यातील चित्रपटगृह : २० 
अवलंबून कामगार व व्यावसायिक : ७०० 
 
लॉकडाउनच्या काळातही कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. शासनाच्या सर्व उपाययोजना अपयशी ठरत असताना आता अनलॉकच्या प्रक्रियेत अन्य व्यवसायांना मुभा दिली जात आहे. मात्र कोणत्याही प्रकारची गर्दी होत नसताना चित्रपटगृहांना परवानगी मिळत नाही. आमचे सर्व कामगार देशोधडीला लागले असून, चित्रपटगृह कायमचे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने त्वरित चित्रपटगृहांना सुरू करण्यासंबंधी परवानगी द्यावी. आम्ही कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या सर्व उपाययोजना अमलात आणू. 
- महेंद्र लुंकड, अध्यक्ष, जळगाव चित्रपट प्रदर्शक संघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com