घाबरू नका..शेतात फिरणारा प्राणी एलियन नव्हे

राजेश सोनवणे
Friday, 25 September 2020

हॉलिवूड चित्रपटांमध्ये वेगवेगळे आकार आणि रचना असलेले प्राणी ॲनिमेशन करून तयार केले जातात. अशाच प्रकारचा प्राणी शेतात फिरत असून शेतकऱ्यांवर हल्‍ले करत आहे. अशी पोस्‍ट सोशल मिडीयावरून व्हायरल केली जात आहे. पण खरच असा प्राणी आहे का? तो शेतातून अचानक हमला तर करणार नाही ना? अशी भिती देखील शेतकऱ्यांमध्ये आहे. फोटोतून व्हायरल होणारा हा प्राणी नेमका कुठला आहे हे जाणून घेवूया

जळगाव : धुळे जिल्ह्यात व्हेल्लाने गावात शेतात आढळून आला विचित्र प्राणी अशी एक खोटी पोस्ट सध्या खानदेशात व्हायरल होत आहे. कुठलीही खातरजमा न करता ती पुढे फॉरवर्ड केली जात आहे. गुजरात सीमेवरून हा एलियनटाईप प्राणी शेतात शिरत असल्याचेही काही पोस्टमध्ये म्हटले आहे. अशी पोस्‍ट सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्‍याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु, धुळे जिल्‍ह्‍यात असा कोणत्‍याही प्रकारचा प्राणी आढळून आला नसल्‍याचे तेथे तपास केल्‍यानंतर सत्‍य समोर आले आहे.

फोटोत पाहून वाटतेय भीती
मानवासारखा चेहरा, धारधार नखे, घुशीसारखी शेपूट असलेल्‍या या कथित प्राण्याचे फोटो शेअर केले जात आहेत. यासोबत नखाचे शरीरावर वार होवून रक्‍तभंबाळ झालेल्‍या शेतकऱ्यांचे फोटो देखील शेअर केले जात आहे. सोबतच शेतकऱ्यांना एकटे शेतात न जाण्याचे आवाहन केले पोस्‍टद्वारे केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. प्रत्यक्षात ही तद्दन खोटी पोस्ट आहे. कुणीतरी हा खोडसाळपणा केला असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. 

जखमी शेतकरी गुजरातमधील
फेक पोस्टमध्ये जखमी पुरुष व स्त्री यांचे जे फोटो आहेत; ते गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पाच शेतकऱ्यांच्या घटनेतील आहेत. २६ ऑगस्टला राजस्थान सीमेला लागून असलेल्या गावात बिबट्याने हा हल्ला केल्‍याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तसेच याच एलियनसारख्या दिसणाऱ्या प्राण्यासोबत अन्य काही फोटो जोडून ते दोन वर्षापुर्वी देखील व्हायरल झाले होते. अर्थात त्‍या प्राण्याचे फोटो एडीट करून वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आला अशी अफवा पसरवत आहेत; सोबत इतर अपघातांचे फोटो जोडून या प्राण्याने केलेला हल्ला म्हणून सांगितले जात आहे

हा प्राणी नेमका कुठला
एलियनसारखा दिसणारा हा प्राणी नेमका कुठे दिसला आणि कोठून आला याची उत्‍सुकता पोस्‍टमध्ये पाहिल्‍यानंतर अनेकांमध्ये होती. पण हा एलियनसारखा दिसणारा प्राणी हा खरा प्राणी नसून लाईरा मागनुको नावाच्या एका इटालियन कलाकाराने तयार केलेली मूर्ती आहे. सिलिकॉन रबरापासून सजीवसदृश्य विचित्र प्राण्यांच्या मूर्ती तयार करण्यात त्यांची हातोटी आहे. लाईरा मागानुको यांच्या फेसबुक पेजवर त्यांच्या या कलाकृतींचे शेकडो फोटो पाहण्यास मिळतात. Laira Maganuco 'गुगल'वर सर्च केले की हे सर्व दिसते. जे फोटो व्हायरल होत आहेत ते काही खऱ्या प्राण्याचे नाहीत. ते फोटो लाईरा मागानुको यांच्या कलाकृतींचे आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon social media viral satya animal attack farmer