वाफ घेताय..पण सावध व्हा; त्‍याचा होतोय दुष्परिणाम  

राजेश सोनवणे
Tuesday, 8 December 2020

कोरोनापासून बचाव व्हावा; या हेतूने घरगुती उपाय म्हणून बाहेर निघतांना, दिवसातून दोन- तीन वेळा वाफ घेणाऱ्यांमध्ये, चुकीच्या पद्धतीने वाफ घेतल्याने डोळ्यांच्या समस्या उद्भवत आहेत.

जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनापासून बचाव व्हावा; म्हणून एकमेव घरगुती उपाय म्हणजे वाफ घेणे. या उपायाचा समाजमाध्यमातून खूपच गवगवा झाला आणि बहुतेकांनी याचा अतिरेक केला. दिवसातून दोन- तीन वेळा वाफ घेणे पसंद केले. परंतु, वाफेच्या फायद्यासोबत आता डोळ्यांवरील दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. 

घरात असतांना वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण यामुळे आधीच कॉम्पुटर व्हिजन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त असलेल्यांना डोळे शुष्क होणे, डोळे लाल होणे या समस्या उद्भवत आहेत. त्यातच कोरोनापासून बचाव व्हावा; या हेतूने घरगुती उपाय म्हणून बाहेर निघतांना, दिवसातून दोन- तीन वेळा वाफ घेणाऱ्यांमध्ये, चुकीच्या पद्धतीने वाफ घेतल्याने डोळ्यांच्या समस्या उद्भवत आहेत. बरेच लोक डोळे उघडे ठेवुन वाफ घेत आहेत. डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, चुळचुळ होणे अशा तक्रारी घेऊन रुग्ण येत आहेत.

अतिउष्‍ण वाफेचा परिणाम
अतिउष्ण वाफेचा डोळ्याच्या नाजूक थरांवर विपरीत परिणाम होत असून डोळे कोरडे पडल्याने लाल होत आहेत. तसेच काही रुग्णांच्या काळ्या बुब्बुळाला इजा होत आहे. त्यामुळे केवळ समाजमाध्यमावर आलेल्या अशा माहितीचे लगेच अनुकरण न करता शास्त्रीय कारण, माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेणे गरजेचे आहे. विनामाहिती अशी अति वाफ घेणे धोक्याचे आहे.

 

अशा समस्‍या उद्‌भवताय
अति वाफ घेत असल्याने डोळे कोरडे होणे. सूज येणे, स्वच्छ मंडळला (काळे बुब्बुळ) इजा होणे, डोळे लाल होणे अशा समस्या समोर येऊ लागल्या आहेत. कॉम्पुटर, मोबाईलचा वापर या लक्षणात आणखी भर घालत असून बऱ्याच रुग्णांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

कोरोनाच्या भीतीपोटी चुकीच्या पद्धतीने अतिवाफ घेतल्याने डोळ्यांवर अशी दुष्परिणाम दिसून येत आहेत तेव्हा भीतीपोटी असे उपाय न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात उपचार घ्या आणि डोळ्यांची देखील निगा राखा.
- डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्ररोग तज्ज्ञ, जळगाव.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon steam but be careful and eye problem