सुरवाडे खुर्द परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस...शेतीचे मोठे नुकसान !

सुरवाडे खुर्द परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस...शेतीचे मोठे नुकसान !

जळगाव  ः बोदवड तालुक्यातील सुरवाडे खुर्द परिसरात सोमवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे सुरवाडे पंचक्रोशीतील सुमारे 40 ते 50 एकर शेती क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, शेतांचे बांध देखील फुटून गेले आहेत. कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद-मूग अशी पिके अक्षरशः वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात सोमवारी रात्रीच्या सुमारास पाऊस पडला. त्यात बोदवड तालुक्यातही ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सुरवाडे खुर्द परिसरात रात्री 11 वाजेनंतर मुसळधार पाऊस झाला. सुरुवातीला कमी मात्र नंतर पावसाचा जोर खूप होता. मध्यरात्रीनंतर 2 वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. याठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या शेतातील अंकुरलेली पिके वाहून गेली. काही शेतकऱ्यांच्या कापसाच्या शेतातील कापसाचे पीक तर वाहून गेलेच, शिवाय कापसाच्या शेतातील ठिबक सिंचन संच देखील वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. सुरवाडे खुर्द येथील निलेश जगन्नाथ शिंदे, प्रकाश शिंदे, गणेश शिंदे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने केलेल्या नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोदवडचे तहसीलदार यांनी मंगळवारी सकाळी सुरवाडे खुर्द परिसराला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, म्हणून पंचनाम्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती यावेळी तहसीलदारांनी दिली. शासनाकडून आम्हाला त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. 

पशुधनाची देखील झाली हानी- 
सुरवाडे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाची देखील हानी झाली आहे. सुरवाडे येथील शेतकरी प्रकाश कडू पाटील यांचा एक बैल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. हा बैल नाल्याच्या पाण्यात मृतावस्थेत आढळला आहे. तहसीलदारांनी या घटनेचाही पंचनामा करण्याचे आदेश तलाठ्याला दिले आहेत. 


तालुक्यातील करंजी परिसरात ५९ मिलीमिटर पाऊस झाला आहे. यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. एक बैल वाहून गेला आहे. अनेक शेतात पाणी साचले आहे. पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. 

-तहसीलदार हेमंत पाटील, बोदवड 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com