राज्‍यातील अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन तूर्त स्थगित 

jalgaon university
jalgaon university

जळगाव : राज्यातील अकृषी विद्यापीठीय व अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्या सोडवाव्यात यासाठी २४ सप्टेंबर पासून सुरू केलेले लेखणी, अवजार बंद व काम बंद आंदोलन गुरुवार (१ ऑक्टोबर) पासून तूर्त स्थगित केलेले असून मागण्यांची पूर्तता न झाल्यास १९ ऑक्टोबरपासून हे आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 
राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, सातवा वेतन आयोग, आश्वासित प्रगती योजनेच्या अंतर्गत दहा, वीस व तीस वर्षांच्या सेवेनंतरच्या तीन लाभांची योजना या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. काही विद्यापीठांनी १ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. 

सामंतांनी केली होती चर्चा
आंदोलनाची दखल घेत २८ सप्टेंबरला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कृती समितीच्या प्रतिनिधींसमवेत ऑनलाइन चर्चा केली होती. या चर्चेच्या अनुषंगाने कृती समितीचे समन्वयक रमेश शिंदे यांच्या समवेत तीन वेळा भ्रमणध्वनी द्वारे चर्चा केली. नमूद दहा मागण्यांपैकी चार मागण्यांसह अन्य दोन मागण्यांची पूर्तता त्वरित करण्याचे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी दिले आहे. तसे टि्वट समाज माध्यमांवर त्यांनी केले. श्री. सामंत हे स्वतः सध्या वैद्यकीय उपचार घेत आहेत. त्यांनी केलेल्या या विनंतीचा मान राखत सेवक कृती संयुक्त कृती समितीने हे आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १७ ऑक्टोबर पर्यंत या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास ते स्थगित आंदोलन १९ ऑक्टोबरपासून पूर्ववत सुरू करण्यात येईल व राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि अनुदानित अशासकीय महाविद्यालयात बेमुदत कामबंद आंदोलन केले जाईल असा इशारा कृती समितीने दिला आहे. 

कर्मचारी आज कामावर
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी या कृती समितीच्या आदेशान्वये आंदोलन तूर्त स्थगित केले असून कर्मचारी गुरूवारी कामावर परतले. त्या आधी कर्मचाऱ्यांची द्वारसभा होऊन कृती समितीचा निर्णय प्रवर्तक अरुण सपकाळे यांनी जाहीर केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजू सोनवणे, जयंत सोनवणे, सुभाष पवार, महेश पाटील, शिवाजी पाटील, शांताराम पाटील, ऑफिसर फोरमचे डॉ. एस. आर. भादलीकर, के. सी. पाटील आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com