पाणी पुरवठा विभागातील या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 July 2020

तालुकास्तरावरील समूह समन्वयक व गटसमूह समन्वयकांच्या सेवा ३० सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

जळगाव : पाणीपुरवठा विभागांतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन येथील कंत्राटी सल्लागार कर्मचारी, तसेच तालुकास्तरावरील समूह समन्वयक व गटसमूह समन्वयकांच्या सेवा ३० सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. या निर्णयाचा राज्यातील तालुका पातळीवरील ३५१ गटसमन्वयक व ८९९ समूह समन्वयकांना लाभ होणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. 
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (ता. २९) व्हीसीद्वारे झालेल्या बैठकीनंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकारांशी बोलत होते. स्वच्छतामंत्री पाटील म्हणाले, की जल जीवन मिशनअंतर्गत तालुका पातळीवर ३५१ गटसमन्वयक व ८९९ समूह समन्वयकांची पदे स्वच्छ भारत मिशनच्या कामासाठी ६ जुलै २०११ च्या शासन निर्णयान्वये निर्माण करण्यात आली होती. या पदांचे मानधन व भत्ते राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या सहाय्य निधीमधून करण्यात येत आहे. तथापि, जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गटसमन्वयक व समूह समन्वयक या पदांसाठी निधीची उपलब्धता नसल्याने या पदांच्या सेवा ३१ जुलै २०२० ला समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ग्रामीण भागासाठी या पदांची आवश्यकता लक्षात घेऊन या पदांना मुदतवाढ मिळावी, याकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून या पदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon water supply department worker Extension