जळगावकरांसाठी आनंदाची बातमी; स्वयंचलित यंत्रणेद्वारे होणार पाणीपुरवठा

सचिन जोशी | Tuesday, 8 December 2020

नवीन यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर पाण्याची आवश्यकता असेल तेव्हा पंप पुन्हा सुरू होईल. कॉम्प्युटर सिस्टिमद्वारे सर्व यंत्रणेवर नियंत्रण ठेवता येईल.

जळगाव : शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व यंत्रणा अद्ययावत होणार असून, मार्च २०२१ नंतर शहराला ऑटोमॅटिक पद्धतीने पाणीपुरवठा होणार आहे. पाणीपुरवठा यंत्रणेत होणारे बदल आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल महापौर भारती सोनवणे यांनी माहिती जाणून घेतली. 

वाचा- वरणगावात दोनशेच्या बनावट नोट

 

Advertising
Advertising

या बैठकीत श्री भैरव इलेक्ट्रोमेक वर्क्स, इस्ट्रो कंट्रोलच्या प्रतिनिधींनी सादरीकरण आणि प्रात्यक्षिकाद्वारे पाणीपुरवठा यंत्रणेच्या अत्याधुनिककरणाची माहिती दिली. बैठकीला स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, नगरसेवक कैलास सोनवणे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी आणि सर्व मनपा अधिकारी उपस्थित होते. 

तांत्रिक बाबींची माहिती 
शहराला स्वच्छ पाणी देण्यासाठी पाण्यावर विविध प्रक्रिया करावी लागते. टाकीत पाण्याची साठवण करावी लागते. पंपिंग हाउसपासून पाणी घेणे, जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पोचविणे, प्रत्येक गोष्टीची वेळोवेळी नोंद ठेवणे ही प्रक्रिया खर्चिक आणि वेळखाऊ आहे. जळगाव शहरात अमृत योजनेंतर्गत नवीन पाइपलाइन टाकताना मनपा प्रशासनाकडून पाणीपुरवठा यंत्रणा इलेक्ट्रिकल आणि स्काडा सिस्टिमद्वारे (supervisory control and data acivisory system) अद्ययावत करण्याचे निश्चित करण्यात आले होते. 

तंत्रज्ञानाद्वारे रासायनिक परीक्षण 
नवीन यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर पाण्याची आवश्यकता असेल तेव्हा पंप पुन्हा सुरू होईल. कॉम्प्युटर सिस्टिमद्वारे सर्व यंत्रणेवर नियंत्रण ठेवता येईल. पाण्याचा वेग किती हे कळू शकेल. पाण्याचे रासायनिक परीक्षण ऑटोमॅटिक होईल. 

आवश्य वाचा- थरारक..दुचाकीवर मागून येत पिस्‍तुल काढली आणि पाच मिनिटात खेळ खल्‍लास
 

...तर वाजणार ‘अलार्म’ 
पाणीपुरवठा यंत्रणेत कुठेही दोष निर्माण झाल्यास लागलीच अलार्म वाजणार आहे. तसेच कोणत्या ठिकाणी काय दोष निर्माण झाला हे कळून त्या ठिकाणी असलेल्या ऑपरेटरची माहिती कळणार असल्याने त्याला सूचना देणे शक्य होईल. 

मालेगावच्या योजनेचे प्रात्यक्षिक 
मालेगाव येथे पूर्ण झालेल्या अमृत योजना प्रकल्पाचे प्रात्यक्षिक संबंधित मक्तेदाराने जळगावात बसून करून दाखविले. जळगावातील यंत्रणादेखील त्याच प्रकारे हाताळता येणार असून, धरणावर किंवा जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी न जाता देखील मनपातून नियोजन करणे शक्य होणार आहे. 

पाण्याची गळती समजणार 
नवीन यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर धरणापासून पाण्याच्या टाकीपर्यंत येणाऱ्या पाइपलाइनची गळती कळणार आहे. लवकर गळती समजल्याने त्याठिकाणी तत्काळ दुरुस्ती करणेदेखील शक्य होणार आहे. तसेच प्रत्येक टाकीवरील व्हॉल्व्हचे ऑटोमेशन केले जाणार असून, ठिकठिकाणी सेन्सर बसविले जाणार आहेत. 

अशी आहे उपयुक्तता 
- विद्युत खर्च, मनुष्यबळ वाचेल 
- पाण्याची गळती रोखली जाईल 
- भविष्यातील दुरुस्तीचे नियोजन करता येईल 

- रोज अद्ययावत अहवाल मिळेल, त्यामुळे पारदर्शीपणा वाढेल 

 

संपादन- भूषण श्रीखंडे