स्वार्थ, चिखलफेकीच्या बाजारात जनतेच्या नशिबी यातनाच! 

सचिन जोशी
Monday, 2 November 2020

गेले दोन आठवडे खडसेंचे पक्षांतर, त्याचे भाजप व अन्य पक्षांतील पडसाद, त्यानिमित्ताने होणारी वर्चस्वाची वक्तव्ये यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. बड्या नेत्याच्या पक्षांतराने अपेक्षित खडखडाट झाला... अजूनही होतोय.

उत्तर महाराष्ट्र, खानदेश स्तरावर एकनाथ खडसेंचे पक्षांतर आणि राष्ट्रवादीतील पुनर्वसन, त्या अनुषंगाने खडसे-महाजनांमधील शाब्दिक युद्ध... ‘ईडी अन्‌ सीडी’ची चर्चा... जिल्ह्याच्या पातळीवर भाजपच्या ‘डॅमेज कंट्रोल’च्या बैठका आणि जळगाव शहराचा विचार करता राष्ट्रवादीतील अंतर्गत चिखलफेक आणि महापालिकेतील नगरसेवकांना हजारांची पाकिटे.. एवढेच प्रश्‍न आहेत का? व्यक्तिगत स्वार्थ, आरोप-प्रत्यारोप आणि महत्त्वाकांक्षा या गौण घटकांचा बाजार मांडलाय.. त्यात प्रलंबित योजना व प्रकल्प, विकासाची कामे हे मुद्दे दूरदूरपर्यंत चर्चेत नाहीच. सत्तेची पदे असली तरी सरकार आणि सत्ता खरेच अस्तित्वात आहे का, अशी स्थिती आहे. 

गेले दोन आठवडे खडसेंचे पक्षांतर, त्याचे भाजप व अन्य पक्षांतील पडसाद, त्यानिमित्ताने होणारी वर्चस्वाची वक्तव्ये यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. बड्या नेत्याच्या पक्षांतराने अपेक्षित खडखडाट झाला... अजूनही होतोय. पक्षाला काही फरक पडणार नाही, राष्ट्रवादीचे बळ वाढेल... अशी वक्तव्ये, अंदाज बांधले जाऊ लागले. जळगाव जिल्ह्यात, खानदेशात भाजपला भगदाड तर नाहीच, सध्यातरी छिद्रही पडलं नसेल.. तरी भाजपला ‘डॅमेज कंट्रोल’साठी प्रदेश संघटक विजयरावांची ‘सवारी’ जळगाव जिल्हाभर फिरवावी लागतेय, ही वस्तुस्थिती आहे. 
दुसरीकडे, जळगाव शहरात अनेक समस्या आहेत. स्वच्छता, आरोग्य, रस्ते, पथदीप या सर्व पातळीवर महापालिका यंत्रणा सपशेल फेल, अशी स्थिती आहे. मात्र, त्याचे सोयरसुतक कुणालाही नाही. उलटपक्षी काँग्रेस अस्तित्वहीन आहे, राष्ट्रवादींतर्गत कलहाने परेशान असली तरी महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेची जबाबदारी असताना वॉटरग्रेसमधील गैरव्यवहार, मक्तेदाराकडून नगरसेवकांना मिळणारी पाकिटे यावर पालिकेत एकही सदस्य नसलेल्या राष्ट्रवादीकडून आरोप होतायत. दोन आठवड्यांत या प्रत्येकी पाकिटाची रक्कम १५ हजारांवरून ३० हजारांवर गेलीय. 
पण, एवढे गंभीर आरोप होत असताना सत्ताधारी भाजपकडून कुणी त्याचे खंडनही करत नाही. याचा अर्थ भाजपची या आरोपांना मूक संमती आहे का, असाही होऊ शकतो. विशेष म्हणजे महापालिका सत्तेबाहेरील भाजप पदाधिकारी या तक्रारीत तथ्य असल्याचे मान्यही करतात. याबाबत अभिषेक यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. राज्यात सत्ता असताना याप्रश्‍नी अभिषेक यांनी आपल्या सरकारकडूनच चौकशी करून संबंधितांवर कारवाई करवून घेणेही अपेक्षित आहे, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांचा आरोप केवळ प्रसिद्धीपुरता आहे का, असा प्रश्‍न कुणी उपस्थित केला तर अभिषेक यांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. 
एकंदरीत जळगाव शहराचाच नव्हे तर जिल्ह्याचा कारभार ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असा झालाय. महापालिकेतील समस्या असोत की जिल्ह्यातील प्रश्‍न ते ऐकून घेण्याची व ऐकूनही त्यावर समाधान शोधण्याची कुणाची मानसिकता नाही. ज्यांची मानसिकता असेल त्यांच्याकडे न पद आहे ना सत्ता... स्वार्थ व व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि त्यातून होणारे आरोप-प्रत्यारोप, अगदी चिखलफेकीच्या राजकारणाने वातावरण तापलेय. नागरिक नरकयातना भोगत असताना त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाही, हे कटू वास्तव आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon weakly collum nimitta municipal corporation issue