सरकारकडून अपेक्षित न्याय नाहीच : गिरीश महाजन

सुरेश महाजन
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

भारतीय जनता पक्षाच्यावतीने दुध उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी आज सकाळी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

जामनेर : राज्यात मोठ्या तावा- तावात सात महिन्यांपुर्वी स्थानापन्न झालेल्या महाविकास आघाडी सरकार राज्यातील तमाम जनतेसह शेतकरी वर्गाला उद्धव ठाकरे सरकारकडुन अपेक्षीत न्याय देऊ शकलेले नाही; असा आरोप राज्याचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी येथे केला. 
भारतीय जनता पक्षाच्यावतीने दुध उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी आज सकाळी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात बोलत होते. जिल्‍ह्‍यात ठिकठिकाणी राज्‍य शासनाविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आले.

आघाडी शासनात सर्व चांगल्या योजना बंद
जिल्ह्यासह संपुर्ण तालुक्यातील चांगल्या योजना ज्या शेतकरी- कष्टकरी जनतेच्या हिताच्या होत्या; त्या सर्व थंड बस्त्यात टाकुन बंद करून टाकल्या, मका, कापुस खरेदी बंद आहे. शेतकऱ्यांच्या घरामध्ये माल पडला असून शेततळे, पाणी पुरवठ्यासारख्या योजनाही बंद केल्या. शेतकऱ्यांच्या बांधावर बि-बियाणे, खते देण्याची योजना फेल झाली असुन एकीकडे बोगस बियाणे तर दुसरीकडे पाहिजे ती खते शेतकऱ्यांना मिळत नाही. दुध उत्पादक शेतकरीही बेजार झाला असुन लकरात लवकर या सर्व समस्यांचे निराकरण झाले नाही; तर सरकारविरोधात यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा माजीमंत्री महाजन यांनी दिला. 

रास्‍ता रोको आंदोलन
सोशल डिस्टंगसींगचे पालन करून काही वेळ रास्ता रोको करण्यात आला. गिरीश महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्यावतीने तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, शिक्षण संस्थेचे सचिव जितू पाटील, जिल्‍हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, नवल पाटील, चंद्रशेखर काळे, बाबुराव घोंगडे, राजधर पांढरे, अमर पाटील, गोविंद अग्रवाल आदींसह शेतकरी उपस्थित होते.

 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner bjp girish mahajan aandolan mahavikas aaghadi goverment