
शेतकऱ्यांनी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. त्यांनीही संबंधित व्यापाऱ्याने मक्याचे पैसे अद्याप दिले नसल्याची कैफियत मांडली होती.
जामनेर : दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन सुरू असताना त्यांची फसवणूक अद्याप थांबलेली नाही. तालुक्यातील काही शेतकऱ्यांकडून मका खरेदी करून त्यांना मालाचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नेरी दिगर (ता. जामनेर) व्यापाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील दामू गुजर (संचालक, साईनाथ ट्रेडर्स) असे संशयित व्यापाऱ्याचे नाव आहे.
आवश्य वाचा- अमृत योजनेसाठीचे सर्वेक्षण दोषपूर्ण -
मिराचे पळासखेडा येथील शेतकरी भगतसिंग नरेंद्र राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, व्यापारी सुनील गुजर याने ३१ मेस राजपूत यांच्या शिवारातील गट क्रमांक ५८२/१ शेतात जाऊन २१५ क्विंटल मका खरेदी केला. त्याची किमती दोन लाख ७९ हजार २९० रुपये इतकी आहे. मालाचे पैसे महिनाभरात देतो, असे सांगितले. मात्र, वारंवार पैसे मागण्यास गेले असता, विविध कारणे दाखवून टाळाटाळ केली. त्यामुळे राजपूत यांनी सोमवारी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संशयित सुनील गुजर याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा- जळगावचे जिल्हा रुग्णालय टाकतेय ‘कात’ -
गिरीश महाजनांकडे मांडली कैफियत
तीन-चार दिवसांपूर्वी प्रकाश पाटील, अरुण पाटील (दोघे रा. चिंचखेडा बुद्रुक), नारायण कुमावत, प्रताप कुमावत (दोघे रा. नेरी) यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. त्यांनीही संबंधित व्यापाऱ्याने मक्याचे पैसे अद्याप दिले नसल्याची कैफियत मांडली होती. या व्यापाऱ्याविरोधात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असून, शेतकऱ्यांची मोठ्या रकमेची फसवणूक झाली झाल्याचे आमदार महाजन यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात संबंधित व्यापाऱ्याविरोधात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संपादन- भूषण श्रीखंडे