esakal | अधिकारी ऐकेना म्‍हणून पदाधिकारी देणार राजीनामा
sakal

बोलून बातमी शोधा

jamner panchayat samiti

पंचायत समितीत कर्मचाऱ्यांकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने होत असून, काही दिवसांपूर्वी उपसभापती एकनाथ लोखंडे यांच्यासह काही सदस्यांची पंचायत समिती दालनात बैठक झाली.

अधिकारी ऐकेना म्‍हणून पदाधिकारी देणार राजीनामा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जामनेर (जळगाव) : पंचायत समितीत काही विशिष्ट कामांचे धनादेश न देण्यावरून अधिकारी-पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या लेखी सूचनेला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली. त्यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनाम्याचा पवित्रा घेतला आहे. 
पंचायत समितीत कर्मचाऱ्यांकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने होत असून, काही दिवसांपूर्वी उपसभापती एकनाथ लोखंडे यांच्यासह काही सदस्यांची पंचायत समिती दालनात बैठक झाली. या बैठकीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या सार्वजनिक विहिरी, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेली शौचालयांची कामे व शाळेच्या संरक्षक भिंती अशा काही ठेकेदारांनी केलेल्या कामाचे धनादेश देऊ नये, अशा सूचना सभापती, उपसभापती व सदस्यांनी गटविकास अधिकारी जे. व्ही. कवळदेवी यांना केल्या. अशा आशयाचे पत्र सभापती सुनंदा पाटील यांनी दिले. 

तरीही तीस लाखाचे धनादेश ठेकेदाराला
त्यानंतरही गटविकास अधिकाऱ्यांनी एका कर्मचाऱ्याच्या हातून काही ग्रामपंचायतींचे तब्बल तीस लाखांचे धनादेश ठेकेदाराकडे दिले. यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक राजीनामे देण्यावर चर्चा केली. याबाबत गटविकास अधिकारी कवळदेवी यांना विचारणा केली असता कोणत्याही ठेकेदाराचे बिल काढले नाही. ज्या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव आले होते, केवळ त्यांनाच धनादेश दिल्याचे सांगितले. 

विशिष्ट हेतूने पात्र लाभार्थ्यांना डावलून अधिकारी-कर्मचारी ठेकेदारांची बिले काढतात. अशाच प्रकारे शौचालये, रोजगार हमी योजनेच्या सार्वजनिक विहिरी, शेततळे या कामांचे तब्बल ५० लाखांपर्यंतचे धनादेश दिले जाणार होते. ठेकेदारांचे धनादेश काढू नये, अशा तोंडी व लेखी सूचना आम्ही दिल्या आहेत. तरीही गटविकास अधिकारी कवळदेवी यांनी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून धनादेश दिले. पंचायत समितीत पदाधिकाऱ्यांना किंमत नाही. त्यामुळे सर्वांनी सामूहिक राजीनाम्याची तयारी केली आहे. 
- सुनंदा पाटील, सभापती, पंचायत समिती, जामनेर 

loading image