esakal | पर्यटनस्थळ खुलण्याची शक्यता मावळली 
sakal

बोलून बातमी शोधा

ajintha leni

केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाने देशभरातील जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेऊन १७ मार्चपासून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी लॉकडाऊन करण्यात आली होती.

पर्यटनस्थळ खुलण्याची शक्यता मावळली 

sakal_logo
By
विलास जोशी

वाकोद (ता. जामनेर) : धार्मिक स्थळांसोबत पर्यटनस्थळेही खुली होण्याचे संकेत दिसत असताना दिवाळ सणाच्या मुहूर्तावर धार्मिक स्थळे खुली करण्याची गोड बातमी राज्यशासनाने दिली. मात्र, यात पर्यटनस्थळांचा कोणताही उल्लेख न केल्याने पर्यटनस्थळे खुली होण्याची शक्यता मावळली आहे. 
जागतिक वारसा असलेल्या अजिंठा लेणीला टाळे कायम असल्याचे दिसून येत आहे. देश-विदेशात कोविड विषाणू संसर्गामुळे हाहाकार माजल्याने केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाने देशभरातील जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेऊन १७ मार्चपासून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी लॉकडाऊन करण्यात आली होती. त्यानंतर राज्यशासनानेही राज्यभरात लॉकडाऊन जाहीर केल्याने मंदिरे, प्रार्थनास्थळे, शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती.  

म्‍हणूनच अद्याप टाळे
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बंद करण्याच्या घटनेस जवळपास आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे. दरम्यानच्या काळात राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्यशासनाने जाहीर केला. त्यातच राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे खुली करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाल्याने धार्मिक स्थळांसोबतच पर्यटनस्थळेही लवकरच खुली होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र पर्यटनस्थळे खुली करण्याबाबत कोणताही निर्णय राज्यशासनाने जाहीर न केल्याने अजिंठा लेणी लवकर खुली होण्याची शक्यता मावळली आहे. परिणामी अजिंठा लेणीस अजूनही टाळे कायम आहे. 
 
व्यावसायिकांना आशा कायम 
अजिंठा लेणीतील पर्यटन व्यवसायावर जवळपास ३५० कुटुंबीयांचे आर्थिक भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांसोबत पर्यटनस्थळेही खुली होण्याची आस या लोकांना होती. मात्र या टप्प्यातही अजिंठा लेणी खुली झाली नाही तर निदान १ डिसेंबरला तरी लेणी खुली होईल, अशी भाबडी आशा पर्यटनावर आधारीत व्यावसायिकांना आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top