खरच टंचाई की बनाव...पिकांसाठी शेतकरी उभा रांगेत

urea
urea

जामनेर : सध्या तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांना खतांची मात्रा देणे गरजेचे झाले आहे. पण बाजारात मुख्यतः युरिया खताचीच तीव्र कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगाच-रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले. गेल्या अनेक दिवसांपासून तालुकाभरात युरिया खताची मागणी वाढल्याने बाजारात मात्र संबंधितांद्वारा टंचाई दाखविण्यात येत आहे. या प्रकाराने शेतकऱ्यांना नाइलाजास्तव मूळ भावापेक्षा जास्तीचे पैसे मोजून युरियाची खरेदी करावी लागत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. 

युरियाच्या ४५ किलोची थैली (बॅग) २६६ रुपये किमतीची असली, तरी बहुतांश गरजू शेतकऱ्यांच्या माथी ती ३०० ते ३५० रुपयांना मारली जात आहे. आणि रीतसर पावती घेऊन खरेदी करणाऱ्यास फक्त दोन- तीन थैल्या प्रती शेतकरी देण्याचा प्रकार तालुकाभरात सर्रासपणे सुरू आहे. याचबरोबर दाणेदार खताचीही मोठी मागणी असली तरी कृत्रिम टंचाईमुळे मुळदराच्या (400 रुपये) जास्त भावाने विनाकारण शेतकऱ्यांना खरेदी करावी लागत आहे. 

स्टॉक दाखविण्यात येत नसल्याने घोळ 
संबंधित विक्रेत्यांकडे शासनाच्या कृषी विभागातर्फे स्टॉक अद्ययावत ठेवण्यासाठी थंम-स्वयंचलीत यंत्रांची व्यवस्था करून देण्यात आली असून, त्याद्वारा दररोजचा साठा व विक्री त्यात नमूद करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश असले तरी, बहुतांश खत विक्रेते ४-५ दिवसांनी आपल्या सवडीप्रमाणे नोंदणी करतात अशीही चर्चा असल्यामुळे वरिष्ठ पातळीवर खतांचा साठा शिल्लक किती आहे. याबाबत माहिती वेळेवर मिळत नाही, परिणामी कोणत्या खतांची तालुक्याला किती गरज आहे याचा ठावठिकाणा लागत नसल्याचेही जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले. तरीही आता ऐन खते देण्याच्याच वेळेला कृत्रिम टंचाईचा गैरफायदा नफेखोरी करणाऱ्यांना मिळू नये व पाहिजे त्या प्रमाणात आवश्यक असलेली खते कसे मिळतील याकडे शासनाच्या संबंधित यंत्रांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. 
 
तालुक्यात पहिल्या टप्प्यासाठी युरिया खताचा १३५ मेट्रिक टन इतका पुरेसा साठा आहे, पारंपरिक पद्धतीने नाही, तर नियमानुसार खतांची मात्रा वापरणे गरजेचे आहे, पाऊस सुरू झाल्याने खते घेण्यासाठी गर्दी उसळली असली तरी युरिया शिल्लक आहे, दुसऱ्या टप्प्यासाठी युरिया व अन्य खते वरिष्ठ पातळीवरून नियमानुसार मागविण्यात येत आहेत, जादा भावाने अथवा विक्रेत्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. 
-अभिमन्यू चोपडे, तालुका कृषी अधिकारी, जामनेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com