खानदेशात पाच लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून 

सुनील पाटील
Tuesday, 23 June 2020

जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात १४० कापूस जिनिग प्रेसिंग मिल आहेत. या मिल सप्टेंबर महिन्यात " गणेश चतुर्थी च्या मुहूर्तावर सुरू होऊन पूर्व हंगामी लागवड केलेल्या कापसाची खरेदीला सुरुवात होते. एप्रिलमध्ये जिनिंग बंद होतात.

चोपडा : खानदेशात १४० कापूस जिनिग प्रेसिंग मिल आहेत. पावसाळ्याला सुरुवात होऊनही सुमारे पाच लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे देशात लॉकडाऊन जाहीर केल्याने गाठींचे भाव कमी झाले. जिनिंग मालकांचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

हेपण वाचा - खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने मका खरेदी बंद 

जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात १४० कापूस जिनिग प्रेसिंग मिल आहेत. या मिल सप्टेंबर महिन्यात " गणेश चतुर्थी च्या मुहूर्तावर सुरू होऊन पूर्व हंगामी लागवड केलेल्या कापसाची खरेदीला सुरुवात होते. एप्रिलमध्ये जिनिंग बंद होतात. मात्र, यावर्षी लॉकडाऊन असल्याने दोन महिने वर होऊनही अजूनपर्यंत कापूस जिनिंग सुरू असल्याचे दिसून येत आहेत. 

सीसीआय नावालाच, खासगी व्यापारी कडून लूट 
शेतकऱ्यांचा घरात पडलेला कापूस शासनाने खरेदी करावा यासाठी 'सीसीआय' केंद्रांकडून खरेदी होत होती. मात्र, हे केंद्र नावालाच सुरू आहेत. कधी सुरू होतात पुन्हा बंद पडतात. यामुळे शेतकरी वेठीस धरला जात असल्याने आर्थिक अडचणीत असलेला संतप्त शेतकरी खाजगी व्यापाऱ्यास कापूस देऊन मोकळा होत आहे. शासनाने सीसीआयकडून खरेदी होणाऱ्या कापसाचा शासकीय भाव ५ हजार ३५० असा आहे. मात्र, खाजगी व्यापारी अक्षरशः शेतकऱ्यांची लूट करीत असून ते ४ हजार ३०० पर्यंत खरेदी करीत आहेत. पहिल्यांदाच घरात कापूस दोन महिने पडून राहिल्याने नैसर्गिक आद्र्रता कमी झाली आहे. पर्यायाने वजनात घट त्यात नैसर्गिक वादळ, वारा व पाऊस यामुळेही उत्पन्नात घट याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 

शेतकऱ्यांसह जिनिंग मालकांचेही नुकसान 
कोरोना संसर्गजन्य परिस्थिती मुळे लॉकडाऊन जाहीर झाला. यात २५ मार्च पासून ते २५ मेपर्यंत तब्बल दोन महिने जिनिंग मिल बंद राहिल्यात. यामुळे गाठींचे भाव ४० हजार वरून ३३ हजार पर्यंत झाल्याने या भाव फरकाचा फटका बसल्याने जिनिंग मालकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच कोरोनामुळे आता मजूर मिळत नाही. यामुळे ही खाजगी जिनिंग मालक अडचणीत सापडले आहेत. कशी जिनिंग मिल चालवायची ? या विवंचनेत आहेत. 

सीसीआय खरेदी केंद्र सुरू ठेवा 
ज्या जिनिंगमध्ये शेडची व्यवस्था असेल अशा खासगी जिनिंग शासनाने ताब्यात घेऊन सीसीआय खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी, तसेच शेतकऱ्यांच्या घरात राहिलेला कापूस संपूर्ण खरेदी होत नाही तोपर्यंत सीसीआय खरेदी केंद्र सुरू ठेवावे. यामुळे अडचणीत असलेला शेतकरी थोडा आर्थिकदृष्ट्या मोकळा होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news khandesh five lakh kwintal cotton farmer home