कृषी कायद्याबाबत खासदारांकडून दिशाभूल 

agriculture
agriculture

मुक्ताईनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेला कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, याची जाणीव असतानाही खासदार रक्षा खडसे केवळ पक्षादेश म्हणून या कायद्याचे समर्थन करीत असतील आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असतील तर शेतकऱ्यांच्या मतांवर संसदेत निवडून गेलेल्या खासदारांकडून ही शेतकऱ्यांचीच प्रतारणा आहे, असा आरोप मुक्ताईनगर येथे विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केला. 
श्री. जाधव म्हणाले, की कृषी कायदा जनतेच्या फायद्याचा असेल तर खासदार रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांसमोर त्याचे फायदे सांगावेत. बाजार समितीच्या माध्यमातून यापूर्वी हमीभाव मिळत असे, मात्र या कायद्यामध्ये हमीभाव नसल्याने व्यापारी शेतकऱ्यांना नाडतील व मनमानी वाढेल. तसेच अंबानी, अदानीसारखे उद्योजक गटशेती करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करतील व देशात संस्थानिक राज्य येईल म्हणून या कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून, खासदार केळीपासून पट्ट्याच्या असतानासुद्धा केळी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी केंद्र सरकारकडून अनुदान मागतील काय, हादेखील प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. 

नगरपंचायतीने विश्‍वास गमावला
मुक्ताईनगर नगरपंचायतीत सत्ताधारी गटाचे गटनेते, उपगटनेते तसेच विद्यमान तीन सभापती, माजी सभापती व स्वीकृत सदस्यांसह सत्ताधारी गटाचे नऊ नगरसेवक उपोषणाला बसत असतील तर नगरपंचायतीने विश्वास गमावला असून, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष व सभापती यांनी राजीनामा देऊन ही नगरपंचायत बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासक बसवावा, अशी मागणीदेखील या पत्रकार परिषदेत करण्यात आली. या संदर्भात काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी व नगरविकास मंत्रालयाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. नगरपंचायत येण्यापूर्वी दिलेल्या वचननाम्यातील आश्वासने दोन वर्षे उलटूनही पूर्ण झालेली नाहीत. नेतृत्वालादेखील आश्वासनाचा विसर पडल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. व्यापारी संकुलांची दुरवस्था, शहरातील अस्वच्छता, खुले भूखंड या मुद्द्यांवरही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. पत्रकार परिषदेला श्री. जाधव यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, जिल्हा सचिव आसिफ खान इस्माईल खान, उपाध्यक्ष संजय पाटील, शहराध्यक्ष पवन खुरपडे, ॲड. कुणाल गवई उपस्थित होते. 

अवैध धंद्यांना जबाबदार कोण? 
जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी पोलिस महासंचालकांना भेटून तालुक्यातील अवैध धंद्यांच्या तक्रारी केल्या आहेत. मात्र, गेली तीस वर्षे मुक्ताईनगर तालुक्यावर एकहाती सत्ता कुणाची व त्यातूनच शहरात व तालुक्यात अवैध धंदे वाढीस लागले आणि हे सगळे अवैध धंदे कोणाचे, असा सवालही पत्रकार परिषदेत करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com