खडसेंच्या दणक्यानंतर हलली यंत्रणा; कोविड सेंटरचा भोजन ठेका रद्द 

दीपक चौधरी
Tuesday, 25 August 2020

कोरोना रुग्णांच्या उपचारावर शासन लाखो रुपये खर्च करत आहे. रुग्णांना औषधोपचार, जेवण इतर बाबीवर हा खर्च केला जात आहे. मात्र, मुक्ताईनगर येथील श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयात शासनाच्या वतीने कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची ओरड आहे.

मुक्ताईनगर : येथील खडसे महाविद्यालयाच्या आवारातील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट जेवणासह सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर यांनी सोमवारी थेट कोविड रुग्णालयात धडक देत रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली. अखेर रोहिणी खडसेंच्या दणक्यानंतर आणि माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या सूचनेवरून जेवणाचा ठेका रद्द करण्यात आला आहे. 

कोरोना रुग्णांच्या उपचारावर शासन लाखो रुपये खर्च करत आहे. रुग्णांना औषधोपचार, जेवण इतर बाबीवर हा खर्च केला जात आहे. मात्र, मुक्ताईनगर येथील श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयात शासनाच्या वतीने कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची ओरड आहे. जेवणात अळ्या आढळून आल्याच्या तक्रारी आहेत. असे निकृष्ट जेवण दिले तर रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. रुग्णांनी याबाबत जेवण देणाऱ्या ठेकेदार यांना विचारणा केली असता तुम्हाला आणखी दहा दिवस काढायचे आहेत, असे धमकीवजा उत्तर देण्यात येत असल्याचे तक्रारी रुग्णांनी केल्या आहेत. 

रोहिणी खडसेंकडे तक्रार 
संबंधित ठेकेदाराकडून देण्यात आलेल्या निकृष्ट जेवणाबाबत एका रुग्णाने जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्याकडे तक्रार केली असता रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तहसीलदार यांना घेऊन भाजप पदाधिकारी यांच्यासह थेट कोविड सेंटर गाठले. यावेळी तेथे असलेल्या रुग्णांनी बाहेर येऊन खिडक्यांमधून त्यांना मिळालेले निकृष्ट दर्जाचे जेवण दाखविले व दुपारी तीनपर्यंत जेवण मिळाले नसल्याचे सांगितले, तसेच नियमानुसार कुठलेही प्रोटीनयुक्त जेवण मिळत नाही, औषधे वेळेवर मिळत नाही, पिण्याच्या पाण्याचे आणि आंघोळीला गरम पाणी मिळत नसल्याचे सांगितले. 

नाथाभाऊंनीही दिली भेट
याबाबत रोहिणी खडसे-खेवलकर यांनी कोविड सेंटरमधून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी साधून तक्रार केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करण्याबाबत आश्‍वासन दिले. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी कोविड सेंटरला भेट देऊन तहसीलदार यांना तत्काळ कारवाई करून रुग्णाच्या समस्या सोडविण्याचे सांगितले. यावेळी पंचायत समिती सभापती विद्या पाटील, सदस्य विकास पाटील, राजेंद्र सवळे, माजी सभापती राजू माळी, भाजयुमोचे ललित महाजन, संजय तितूर, शिवराज पाटील, सुनील काटे, नीलेश मालवेकर, पियूष महाजन उपस्थित होते. यावेळी भाजपतर्फे तहसीलदार यांना कोविड सेंटर येथील समस्या सोडविण्याबाबत निवेदन देण्यात आले. 

दोन तास चालले आंदोलन 
जेवण, औषधोपचार व्यवस्थित मिळत नसल्याच्या तक्रारीनंतर रोहिणी खडसे-खेवलकर यांनी तहसीलदारांसह कोविड सेंटर गाठले. गेटवर दोन तास उभे राहून जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली. यानंतर अर्धा तासाने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी देखील तेथे भेट दिली. तहसीलदारांनी भोजन पुरवठादाराचा ठेका रद्द केल्याचे सांगितल्यावर दोन तास चाललेले आंदोलन थांबविण्यात आले. 

संपादन  राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muktainagar covid center dinner contract cancel in khadse entry