काॅलेज प्रवेशाची मुदत संपली, आणि आईची साडी घेवून त्याने संपविले जीवन  

चंद्रकांत चौधरी
Friday, 18 September 2020

शैक्षणिक नुकसान होईल या भीतीने तो निराश झालेला असावा व त्याच निराशेपोटी त्याने आपल्या अभ्यास खोलीत आईच्या साडीने गळफास घेवुन आत्महत्या केली

पाचोरा  ः  येथील भडगाव रोड भागातील शासकीय विश्रामगृहा जवळच्या लक्ष्मीबाई वाघ नगरात राहणाऱ्या व राहुरी येथील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात बीएससी ऍग्रीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण पूर्ण करून तृतीय वर्षाच्या प्रवेशासाठी प्रतीक्षेत असलेल्या 22 वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या अभ्यासाच्या खोलीत आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आल्याने परदेशी कुटुंबीय कमालीचे खचले आहे.

आवश्य वाचा ः  डॉ. प्रवीण मुंडे जळगावचे नविन पोलिस अधिक्षक 
 

सातगाव डोंगरी (ता पाचोरा) येथील मूळ रहिवासी असलेले सेवानिवृत्त प्रा. विजयसिंग परदेशी हे पाचोरा येथील लक्ष्मीबाई वाघ नगरात वास्तव्यास आहेत. त्यांना दोन मुली व दुर्वेश हा एकुलता एक मुलगा. दुर्वेशने राहुरी येथील कृषी महाविद्यालयातून बीएससी ऍग्रीच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण पूर्ण केले व सध्या तो घरीच अभ्यास करत तृतीय वर्ष प्रवेशाच्या प्रतीक्षेत होता.

 

गेल्या काही दिवसापूर्वी त्याने प्रवेशासंदर्भात आपल्या राहुरी येथील महाविद्यालय सूत्रांकडून चौकशी केली असता आता रजिस्ट्रेशन होणार नाही पण वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले तर रजिस्ट्रेशन केले जाईल . असे सांगण्यात आल्याने त्याने वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून मेल द्वारे पत्रव्यवहार केला असता आता मुदत संपली आहे प्रवेश होणार नाही असे त्यास सांगण्यात आल्याचे परदेशी कुटुंबीयांकडून स्पष्ट करण्यात आले. आता आपले शैक्षणिक नुकसान होईल या भीतीने तो निराश झालेला असावा व त्याच निराशेपोटी त्याने आपल्या अभ्यास खोलीत आईच्या साडीने गळफास घेवुन आत्महत्या केली असावी असा प्राथमीक अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

आवर्जून वाचा ः  चोरीला गेले पशुधन, आणि ते शोधण्यासाठी चक्क पोलिस ठाण्यातच लागल्या रांगा !
 

दुर्वेशचे वडील प्रा. परदेशी हे सातगाव डोंगरी येथे शेती कामासाठी गेले होते तर आई व बहीण स्वयंपाक खोलीत जेवणाची तयारी करीत होत्या. दुर्वेशला जेवण करण्यासाठी बोलावण्यास गेले असता त्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. यावेळी परदेशी कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. मयत दुर्वेशच्या दोन्ही बहिणी वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवीधारक असून तो एकुलता एक ,हुशार व मनमिळावु होता.

नक्की वाचा ः  पैसे भरण्यासाठी बँकेत आला आणि क्षणातच त्याची पिशवी झाली गायब, आणि सर्वाचे उडाले होश !

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात डॉ अमित साळुंखे यांनी त्याचे शवविच्छेदन केले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा पालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय वाघ, सातगाव डोंगरीचे माजी सरपंच प्रा भागवत महालपुरे, नितीन तावडे यांनी परदेशी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी धाव घेतली. दुर्वेशच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून तपासा अंती नेमके कारण स्पष्ट होईल.
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora Agri's student committed suicide by snatching his mother's sari at home