पाचोऱ्यात सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात भाजपने पोस्टरबाजीकरून फुंकले रणशिंग ! 

चंद्रकांत चौधरी
Thursday, 17 September 2020

नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा आरोप करून शहरवासीयांसाठी बोटक्लबची निर्मिती करून दाखविल्याबद्दल जाहीर आभार मानणारे उपरोधात्मक टीकेचे पोस्टर शहरातील कॉलन्यांमध्ये लावले.

पाचोरा : येथील आमदारांच्या नेतृत्वाखालील पाचोरा पालिकेच्या भोंगळ कारभाराने त्रस्त झालेल्या जनतेच्या व्यथा प्रदर्शित करणारी अनोखी पोस्टरबाजी करून येथील भाजपतर्फे ‘होय करून दाखवलं’ या शीर्षकाखाली सत्ताधाऱ्यांना चिमटे काढण्यात आले. या पोस्टरबाजीमुळे सत्ताधारी शिवसेनेविरोधात भाजपने रणशिंग फुंकल्याने पाचोऱ्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. 

शहरात पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामामुळे पर्यायी व्यवस्था व कुठलेही नियोजन न केल्याने नागरिकांना कोरोनासारख्या परिस्थितीत तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. सोमवारी (ता. १४) झालेल्या मुसळधारेमुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आणि पुन्हा एकदा पालिकेचा भोंगळ कारभार निदर्शनास आला. यात प्रामुख्याने भुयारी मार्गात पूर्णपणे पाणी साचून तलावाचे स्वरूप पाहायला मिळाले. नागरिकांना जिवाची पर्वा न करता कंबरेपेक्षा जास्त पाण्यात उतरून मार्ग काढावा लागला. 

भाजपकडून पूर्ण परिस्थितीला पालिका व आमदार जबाबदार असून, त्यांनी नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा आरोप करून शहरवासीयांसाठी बोटक्लबची निर्मिती करून दाखविल्याबद्दल जाहीर आभार मानणारे उपरोधात्मक टीकेचे पोस्टर शहरातील कॉलन्यांमध्ये लावले. त्यासोबतच आमदारांनी शहरात निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे आरोप करत, शहरातील विविध भागांमधील घाणीने भरलेल्या गटारी, जागोजागी कचऱ्याचे साचलेले ढीग, भुयारी मार्गात साचलेले पाणी, निकृष्ट दर्जाचे तयार केलेले रस्ते व त्यावर झालेले खड्डे, चिखल आदी निकृष्ट दर्जाच्या कामाची छायाचित्रे काढून त्यांना लोणार सरोवर, जळगाव येथील मेहरूण तलाव, आनंदसागर येथील कारंजा, वॉटरपार्क, तसेच मोफत रुग्णालयात घेऊन जाणारा रस्ता अशा उपमा देऊन उपरोधात्मक टीका करणारे पोस्टर लावून नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडली. यामुळे समस्या व केलेल्या कामांबाबतचे गांभीर्य लक्षात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 

नगराध्यक्षांच्या दालनालाच हार 
नगराध्यक्ष संजय गोहिल यांचा भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात सत्कार करून आभार मानण्यासाठी पालिकेत गेले असता, नगराध्यक्षांचे दालन बंद असल्याने त्यांच्या दालनाच्या प्रवेशद्वारालाच हार व श्रीफळ वाढवून आभारपत्र चिकटवून सत्ताधाऱ्यांचे आभार मानण्यात आले. भाजप शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस दीपक माने, गोविंद शेलार, संजय पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष समाधान पाटील, सरचिटणीस भय्या ठाकूर, कुमार खेळकर, वीरेंद्र चौधरी, जगदीश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर संचेती, रमेश शामनानी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

 
आमदारांच्या नेतृत्वाखाली पालिकेची विकासकामे होत आहेत, त्यांचे वास्तव पोस्टरच्या माध्यमातून जनतेसमोर मांडून कामे कशी केली आहेत, हे पालिका व आमदारांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलन केले आहे. यापुढेही चुकीच्या बाबींसंदर्भात आंदोलन केले जाईल. 
-अमोल शिंदे, तालुकाध्यक्ष, भाजप, पाचोरा 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora dispute has arisen between the ruling Shiv Sena and the BJP in the municipality and an agitation was organized by the BJP