खाद्यतेल कडाडले..वाढलेले दर पाहून व्हाव अवाक

संजय पाटील
Sunday, 3 January 2021

गेल्या महिन्यात भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे गृहिणी दैनंदिन गरजेपुरता लागेल तेवढा भाजीपाला खरेदी करीत काम भागवून घेत होत्या.

पारोळा (जळगाव) : सध्या भाजीपाल्याचे दर स्थिर होत असतानाच स्वयंपाकासाठी लागणाऱ्या खाद्यतेलाचे भाव कमालीचे कडाडले आहेत. सोयाबीन तेल शनिवारी १२७ रुपये, तर शेंगदाणा तेल १७० रुपये प्रतिकिलोने विकले गेले. भाव आणखी वाढण्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत. 

भाजीपाला स्‍थिर पण
गेल्या महिन्यात भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे गृहिणी दैनंदिन गरजेपुरता लागेल तेवढा भाजीपाला खरेदी करीत काम भागवून घेत होत्या. यात बटाट्याने भाव खात १२० रुपये किलोपर्यंत मजल मारली होती. परंतु नवीन बटाटे बाजारात आल्याने दर कमी होऊन ३० रुपये किलोने विक्री होत आहे. एकेकाळी सोयाबीन तेलाचे भाव स्थिर होते, तर भाजीपाला महाग झाला होता. आता भाजीपाला स्थिर झाला, मात्र रोजच सोयाबीन तेलाचे भाव वाढत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. 

सोयाबीन न पिकल्‍याचा फटका
गेल्या मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही सोयाबीन तेलाचे भाव स्थिर होते. मात्र, सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाल्यामुळे तेलाचे भाव रोजच वधारत आहेत. अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे सोयाबीन पीक पाहिजे, त्या प्रमाणात न आल्याने सोयाबीन तेलाचे भाव वाढल्याची चर्चा बाजारात आहे. याचा परिणाम मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटवर झाला आहे. 

महागाईकडे सरकारचे दुर्लक्ष 
कोरोनाचा सावटामुळे अगोदरच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात नेहमी लागणाऱ्या उपजीविकेच्या वस्तू यात खाद्यतेल व गॅसचे वाढते दर याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. याबाबत कुणीही आवाज उठवत नसून, सर्वसामान्य नागरिक मात्र भरडला जात आहे. 

तेलाचे सध्याचे दर (प्रतिकिलो) 
शेंगदाणा तेल : १७० 
सोयाबीन तेल : १२७ 
सूर्यफूल तेल : १३७ 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola edible oil hardened and home budget down