
सध्या परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील मका लागवड केलेल्या क्षेत्राला गेल्या महिन्याभरापासून पाणी मिळत नसल्याने पिके कोमेजू लागली आहेत.
पारोळा : मागील दीड महिन्यापासून जळालेले रोहित्र बदलून मिळत नसल्याने अखेर दबापिंप्री (ता. पारोळा) शेती परिसरातील शेतकऱ्यांनी बांधावर एकत्र येत रोहित्र बदलून देण्याची मागणी केली. मागणीची दखल येत्या काही दिवसांत न घेतल्यास उपोषणाचा इशाराही या वेळी शेतकऱ्यांनी दिला.
वाचा- म्हैस विक्रीचे पैसे मागितले आणि कोयत्याने हल्ला केला ! -
दबापिंप्री शेती परिसरातील पारोळा-अमळनेर रस्त्याला जवळील रोहित्र गेल्या दीड महिन्यापासून जळाले असून, हे रोहित्र जळाल्यानंतर पाचोरा येथे पाठविण्यात आले आहे; परंतु रोहित्र पाठवून दीड महिना झाला असला तरी अद्यापही येथील शेतकऱ्यांना नवीन रोहित्र मिळालेले नाही. याबाबत शेतकरी दररोज महावितरणच्या कार्यालयात जाऊन पाठपुरावा करीत आहेत. मात्र विभागाकडून नवीन रोहित्र दिले जात नसल्याने शेतकरी पूर्णपणे हैराण झाले आहेत.
सध्या परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील मका लागवड केलेल्या क्षेत्राला गेल्या महिन्याभरापासून पाणी मिळत नसल्याने पिके कोमेजू लागली आहेत. सर्व पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके पूर्णपणे जळून जात आहेत. शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील नुकसान होत आहे. म्हणून रोहित्र तत्काळ मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली असून, शेतकऱ्यांना तत्काळ रोहित्र न मिळाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
या वेळी सचिन मनोरे, रवींद्र नेरकर, निंबा बिरारी, राहुल जाधव, समाधान पाटील, हिरामण पाटील, जगदीश मनोरे, भाऊसाहेब पाटील, रवींद्र पाटील, भय्या नाईक, गणेश पाटील, मोतीलाल बिरारी, सागर धनगर, आधार पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.
तालुक्यात ३५ रोहित्रे नादुरुस्त
तालुक्यात विजेचा कमी-जास्त वापर किंवा तांत्रिक अडचणीमुळे तालुक्यातील ३० ते ३५ रोहित्रे नादुस्त वा जळाली आहेत. याबाबत तालुक्यातील संबंधित विभागाकडून अहवाल पाठविला आहे. मात्र पाचोरा येथून रोहित्र, ऑइल कमतरता यामुळे विलंब होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तालुक्याच्या ठिकाणी वर्कशॉपबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
रत्नापिंप्री येथील रोहित्र बदलून मिळाल्याचा प्रस्ताव पाचोरा येथे गाळण कक्ष येथे पाठविला आहे. याबाबत पाठपुरावा सुरू आहे. रोहित्र मिळाल्यास तत्काळ बसविण्याची कार्यवाही करण्यात येईल.
-पी. एम. पाटील उपकार्यकारी अभियंता उपविभाग, पारोळा