केळी प्रश्नांबाबत शिवसेना आमदाराने मुख्यमंत्र्यांना घातले साकडे !

संजय पाटील
Monday, 19 October 2020

केळी फळाचा वापर शालेय पोषण आहारात करण्यात यावा जेणे करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना चालना मिळण्यास मदत होईल. तसेच केळी हे पौष्टिक व सर्वात स्वस्त फळ असल्याने याचा शालेय पोषण आहारात वापर करण्यात यावा.

पारोळा : जळगाव जिल्ह्यातील केळी पिक, केळी उत्पादक शेतकरी, टिशु कल्चर लॅब, केळी पिक विमा योजना आदी विषयांवर शेतकऱयाना त्वरीत मदत मिळावी. तसेच केळी प्रक्रिया उद्योगांना चालणा मिळावी अशा विविध मांगण्याचे निवेदन शिवसेना आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. 

वाचा- शेतकऱ्यांचे पांढरे सोने मजुर अभावी शेतातच पडून ! 
 

शासनाच्या मागील वर्षीच्या ट्रीगरमध्ये व चालू वर्षीच्या ट्रीगर मध्ये खूप मोठी तफावत दिसून येत आहे. आपण संदर्भिय आदेशानुसार ट्रीगरवर लावलेल्या अटी व शर्तीप्रमाणे राज्यात तापमानाचा विचार केल्यास ट्रीगर ठरवितांना सतत 15 दिवसांपेक्षा जास्त 8 डिग्री पेक्षा कमी किंवा 45 डिग्री पेक्षा जास्त तापमान असेल तर 45000/- रुपये नुकसान भरपाई देय केलेली आहे. या तापमानात केळी पिक येवूच शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार असून त्यांना पिक विमा काडलेल्याचा फायदा देखील होणार नाही व शासकीय अनुदान देखील प्राप्त होणार नाही. तरी सदरील सन 2020 ते 2023 साठी केळी पिकाच्या मानके (ट्रीगर) वर बळिराजाच्या हिताचे व बळिराजाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन योग्य ते बदल करावे. तसेच केळी महामंडळ अंतर्गत केळी प्रक्रिया उद्योगाला चालना देणेसाठी केळी उत्पादन शेतकऱ्यांचा उत्कर्ष व विकासासाठी केळी महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. आज केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे असे निवेदनात आमदारांनी म्हतले आहे. 

केळी प्रक्रिया उद्योगाला चलणा मिळावी

केळी प्रक्रिया उद्योगाला चालना दिल्यास स्थानिक ठिकाणीच केळीची मागणी वाढून केळीला चांगला बाजारभाव मिळेल. तसेच बऱ्याच लोकांना रोजगार मिळण्याची संधी देखील प्राप्त होईल तरी केळी महामंडळ अंतर्गत केळी प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी. तसेच आता दर्जेदार केळी उत्पादनासाठी केळी उत्पादक शेतकरी टिश्यू (उतीसंवर्धित) रोपांची लागवड करत असतात. ती केळी रोपे 15 रुपये प्रती रोप प्रमाणे मिळत असतात. ज्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च खूप वाढलेला असतो. जर शासनाने टिश्यू (उतीसंवर्धित) रोपांचा प्रकल्प सुरू केला तर कमी खर्चामध्ये केळी रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध होतील. मागील सरकारने या प्रकल्पाचे काम हाती घेतलेले होते. या अंतर्गत एक प्रयोगशाळा संशोधन प्रकल्प देखील सरकारला जाणार होता.

टिशू कल्चर लॅबला सुरू व्हावी

जळगाव जिल्ह्यातील यावळ तालुक्यातील हिंगोणा गावांत जागेची पाहणी तज्ञ समिति मार्फत करण्यात आलेली होती. 50 एकर जमिनीची त्याकामी आवश्यकता पूर्ण करण्यात आलेली आहे. जिल्हा नियोजन समितीला याबाबत माहिती देखील देण्यात आलेली होती. जिल्हा स्तरीय बैठकांमध्ये या प्रकल्पाबाबत चर्चा झाली असून निधी व अंतिम मंजूरी याबाबत कार्यवाही रखडली आहे. तरी या केळीचा उतीसंवर्धित रोपांचा प्रकल्प(टिश्यू कल्चर लॅब) सुरू करण्यासाठी प्रकल्पाला गती देवून त्वरित मार्गी लावावे तसेच सी. एम. व्ही. विषाणूजन्य प्रादुर्भावामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी. अनेक शेतकऱ्यांनी मे, जून, जुलै महिन्यात टिश्यूकल्चर केळी रोपांची लागवड केलेली होती. प्रतिरोप 15 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांनी खर्च देखील केलेल्या होता. यावर्षी त्या टिश्यूकल्चर रोपांवर सी. एम. व्ही. विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भावामुळे हजारो हेक्टर वरील केळी पिकाचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.

आवश्य वाचा- म्‍हणून भाजपकडून सुशांतसिंह राजपूत जिंदाबादचा नारा : मंत्री गुलाबराव पाटील
 

पोषण आहारात केळी समावेश व्हावा 

नुकसानग्रस्त केळी पिकाचे महसूल व कृषि विभागाने रीतसर पंचनामे सुद्धा पूर्ण केलेले आहेत. तरी नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. तरी सदरील नुकसान भरपाई त्वरित यावी. केळी फळाचा वापर शालेय पोषण आहारात करणे यावी. केळी सर्वात पौष्टिक फळ आहे. यामध्ये लोह, खनिज पदार्थ व शरीराला आवश्यक घटक आहेत. केळी ही फळ पचनास हलके व पित्तशामक आहे. लहान मुलांच्या वाढीसाठी तर अत्यंत उपयुक्त असे फळ आहे. केळी फळाचा वापर शालेय पोषण आहारात करण्यात यावा जेणे करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना चालना मिळण्यास मदत होईल. तसेच केळी हे पौष्टिक व सर्वात स्वस्त फळ असल्याने याचा शालेय पोषण आहारात वापर करण्यात यावा अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री दादा भुसे, जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडे केली आहे.  
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola MLA Chimanrao Patil made a statement to the Chief Minister regarding the problems of banana crop and farmers