कपाशीचा पेरा नसतांनाही उताऱ्याचा ग्राहक धरल्यास फौजदारी गुन्हे : आमदार चिमणराव पाटील

संजय पाटील
Sunday, 11 October 2020

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून हेही वर्ष जातांना दिसत असल्यामुळे पिक पाहणी व पिकपेरा त्वरित लावा. लाल्या रोगांचे पंचनामे तात्काळ करा, सात बारा उतारे लवकर देण्याच्या सुचना करुन शेतकऱ्यांना सरसकट मदतीबाबत आग्रही राहणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

पारोळा (जळगाव) : शेतकऱ्यांच्या नावावर काही व्यापारी आपला कापुस मोजुन शासनाची दिशाभुल करण्याचे प्रकार गतकाळात झाले आहेत. शेतकऱ्यांनी आमिशाला बळी न पडता आपले उतारे व्यापाऱ्यांना देवु नये; तसेच ज्यांचा पिकपेरा कपाशीचा नसेल त्यांचा कितीही दबाब आल्यास मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी उतारे देवू नये; याबाबतच्या तक्रारी आल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे संकेत आमदार चिमणराव पाटील यांनी दिले.
पारोळा तहसिल कार्यालयात मतदार संघाच्या मंडळ व तलाठी यांच्या संयुक्त बैठकित बोलत होते. उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, पारोळा तहसिलदार अनिल गवांदे, एरंडोल तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांचेसह नायब तहसिलदार बी. एन. शिंदे, जितेंद्र पाडवी यांचेसह बाजार समिती संचालक मधुकर पाटील, प्रा. बी. एन. पाटील, सेना शहर प्रमुख अशोक मराठे यांचेसह मतदार संघातील मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.

आमदार पाटील यांनी मागील वर्षी पारोळा तालुक्याने विक्रमी कापसाची खरेदी केल्याचे सांगून ज्वारी व मका खरेदी ही पारदर्शी न झाल्याचे ही मान्य केले. मागील वर्षी झालेल्या चुका पुन्हा होणार नाही. याबाबत काळजी घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून हेही वर्ष जातांना दिसत असल्यामुळे पिक पाहणी व पिकपेरा त्वरित लावा. लाल्या रोगांचे पंचनामे तात्काळ करा, सात बारा उतारे लवकर देण्याच्या सुचना करुन शेतकऱ्यांना सरसकट मदतीबाबत आग्रही राहणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

कापुस कटतीबाबत ग्रेडरांनी लक्ष द्यावे 
मागील वर्षी शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर कटती केली जात असल्याच्या तक्रारी निर्देशनास आल्या होत्या. यंदा मात्र ग्रेडर यांनी तत्पर राहुन शेतकऱ्यांच्या कापसाला कटती लागणार नाही. याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले.

धुळपिंप्री येथील वारसास मदत
धुळपिंप्री येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधीर दगडु पाटील यांचे वारस वैशाली सुधीर पाटील यांना आमदार चिमणराव पाटील यांचे हस्ते एक लाखाचा धनादेश देण्यात आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola mla chimanrao patil meeting officer farmer cotton