हे ग्रामीण रुग्णालय सुसज्‍ज...लोकसहभागातून कायापालट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

कुटीर रुग्णालयात कायमस्वरुपी किमान ३० बेड, ऑक्सिजन, पाइपलाइनचे बेड, पोर्टेबल एक्स-रे मशीन, शुध्द आरओ पाणी, लहान बाळाची पेटी, मेडिकल रेडिएंट वाँर्मर अशा सुविधेसाठी सर्वाचे सहकार्य मिळणार आहे. 

पारोळा : तालुका पातळीवरच्या ग्रामीण रुग्णालयातच रुग्णांना ‘कोरोना’पासून बचाव व्हावा, तसेच येणाऱ्या विविध साथींचा आजाराचे निराकरण तालुका पातळीवर व्हावे, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या संकल्पनेतून ग्रामीण रुग्णालयांचे चित्र बदलणार आहे. तहसील कार्यालयात आज यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यात लोकवर्गणीतून ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडसह इतर साहित्य उपलब्ध करून लवकरच पारोळा येथील ग्रामीण रुग्णालय सुसज्ज केले जाणार आहे, अशी माहिती प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी दिली.

नक्‍की पहा - कडक लॉकडाउनसाठी जिल्हाधिकारीच रस्त्यावर...पोलिसांची उडाली धावपळ
 
यावेळी प्रांत अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, डॉ. योगेश साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य हिंमत पाटील, शहर तलाठी निशिकांत पाटील, डॉ. प्रांजली पाटील यांच्यासह व्यापारी महासंघ व विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. 
येथील कुटीर रुग्णालयात कायमस्वरुपी किमान ३० बेड, ऑक्सिजन, पाइपलाइनचे बेड, पोर्टेबल एक्स-रे मशीन, शुध्द आरओ पाणी, लहान बाळाची पेटी, मेडिकल रेडिएंट वाँर्मर अशा सुविधेसाठी सर्वाचे सहकार्य मिळणार आहे. 

रुग्णालयासाठी यांचे योगदान 
एरंडोल-पारोळा मतदारसंघातील दोन्ही ग्रामीण रुग्णालयांत प्रत्येकी २० ऑक्सिजन बेडसाठी आमदार चिमणराव पाटील यांनी साडेपाच लाखांचा निधी दिला आहे. तर पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्याकडून ३ लाख, वॉटर आरओ मशीन इशांत जैन, पोर्टेबल एक्स-रे मशीन, मेडिकल रेडीएंट वॉर्मर व्यापारी महासंघ, प्रांताधिकारी १० हजार, तहसीलदार, पारोळा १० हजार, तलाठी संघटना २२ हजार, उंदिरखेडा उपसरपंच ११ हजार, उपनिरीक्षक नीलेश गायकवाड ५ हजार यांनी आज मदत जाहीर केली असून, रोख रक्कम ५८ हजार जमा झाली आहे तर अनेक जण मदतीसाठी पुढे येणार आहेत. 

सुविधेमुळे रुग्णांना दिलासा मिळणार 
ग्रामीण रुग्णालयात सुविधांअभावी बऱ्याच वेळा रुग्णांना उपचारासाठी बाहेरगावी जावे लागत होते. किंबहुना आता ग्रामीण भागात लोकवर्गणीतून या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर निश्चितच रुग्णांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान कोरोना काळातील परिस्थिती पाहता मतदारसंघासाठी ५० लाखाचा निधी राखीव ठेवण्यात आल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी बैठकीत भ्रमणध्वनीवरुन संवाद साधताना सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola rural hospital renuvation Public participation