राज्य अनलॉक मात्र भजन- काकड आरतीला अजुनही ताळेबंदी 

संजय पाटील
शुक्रवार, 10 जुलै 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाउन पुकारण्यात आला होता. साधारण अडीच महिने लॉकडाउन राहिल्यानंतर देशात अनलॉक सुरू करण्यात आला. यात अटीशर्तीवर काही दुकाने, मॉल व विवाह सोहळे घेण्यास परवानगी मिळाली. परंतु, मंदिरातील काकडाआरती व भजनला अद्याप परवानगी नाही.

पारोळा : कोरोनाचा सामना संपूर्ण देश करित आहे. अशा कठीण परिस्थितीत देशाची आर्थिक चक्रे फिरण्यासाठी सर्वच उद्योग धंद्यासह समाजातील विवाह सोहळ्यांना परवानगी मिळाली. मात्र मंदीरातील काकड आरती व भजन उपासना पध्दतीला अजुनही ताळेबंदी असल्याची खंत अखिल भारतीय वारकरी संप्रदायाच्या पदाधिकारी यांनी केली आहे. 

हेही पहा - चीन, जपान कशी देतंय कोरोनाला मात...मग आपण सर्वांनी हे करायलाच हवं

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाउन पुकारण्यात आला होता. साधारण अडीच महिने लॉकडाउन राहिल्यानंतर देशात अनलॉक सुरू करण्यात आला. यात अटीशर्तीवर काही दुकाने, मॉल व विवाह सोहळे घेण्यास परवानगी मिळाली. परंतु, मंदिरातील काकडाआरती व भजनला अद्याप परवानगी नाही. किमान 25 ते 50 व्यक्तींच्या समुदायाच्या उपस्थितीत प्रवचन व किर्तनास परवानगी मिळावी; अशी मागणी अ.भा. वारकरी मंडळ यांनी केली. याबाबत राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना निवेदन देण्यात आले. भाजपा अध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले, अखिल भारतीय संन्यासी संप्रदायचे स्वामी विश्वेश्वरानंद, अ. भा. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले उपस्थित होते. 

नियम लावून मिळावी परवानगी 
निवेदनात म्हटले की, केंद्र सरकार व राज्य सरकारने ठरवून दिलेल्या सर्व नियमावलीचे पालन करुन सध्या लग्नविधीसाठी पन्नास लोकांना परवानगी तर मंगलकार्य व अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच ठराविक वेळेमध्ये दुकाने उघडून सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न शासन करत आहे. मात्र, मंदिरातील भजन, पूजन व काकडा आरती आदी उपासनापद्धती बंद आहेत. यासाठी राज्यपाल यांनी वारकरी संप्रदायास न्याय देत नियमांचे पालन करुन काकड आरती व भजन उपासनेस परवानगी द्यावी; अशी मागणी अ.भा. वारकरी मंडळाने केली आहे. याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पातळीवर देखील निवेदन दिले होते. मात्र निवेदन देवुनही याबाबत विचार झाला नसल्याची खंत व्यक्त केली. 

निघू शकतो तोडगा 
लॉकडाऊनच्या काळात अडचणीत असलेल्या गायक व वादक यांच्यासह छोटे प्रवचनकार व कलावंत यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी. जेणे करुन त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल. याविषयी राज्याचे राज्यपाल यांना वारकरी मंडळाकडुन निवेदनातुन विनंती करण्यात आली आहे. याबाबत राज्यपाल श्री. कोशारी यांच्याशी चर्चा होऊन शासनास तसे निर्देश करण्यात येतील असे आश्वासित केल्याचे अ.भा.वारकरी मंडळाकडून सांगण्यात आले.

संपादन : राजेश सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola unlock state and open shop but no permission tempal bhajan