esakal | केळी पीकविम्यासाठीचे निकष बदलणार 
sakal

बोलून बातमी शोधा

banana

ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी यांत्रिकीकरणांतर्गत अत्याधुनिक अवजार केंद्र उभारण्यात यावे, या मागण्यांसाठी शनिवारी (ता. ८) नवी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांची माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी भेट घेतली.

केळी पीकविम्यासाठीचे निकष बदलणार 

sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर : हवामानावर आधारित केळी फळ पीकविम्याचे अन्यायकारक निकष बदलणे, पानवेली उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पॅकेज, जिल्ह्यात रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा, तसेच ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी यांत्रिकीकरणांतर्गत अत्याधुनिक अवजार केंद्र उभारण्यात यावे, या मागण्यांसाठी शनिवारी (ता. ८) नवी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांची माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी भेट घेतली. या वेळी त्यांच्यासोबत खासदार उन्मेष पाटील उपस्थित होते. 

या मागण्यांबाबत सविस्तर माहिती माजी मंत्री महाजन व खासदार पाटील यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांसमोर मांडली. यावर त्यांनी तत्काळ कार्यवाहीचे दिले आदेश दिल्याने लवकरच हवामानावर आधारित केळी फळपीक विमा योजना निकष पूर्ववत होतील, अशी अपेक्षा आहे. 

योजनेचे निकष पूर्ववत होणार 
जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने कपाशीसोबत केळी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने २०२०-२१ ते २०२२-२३ या कालावधीसाठी केळी पिकाच्या निकषांमध्ये अन्यायकारक बदल केले असून, यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत पुनर्विचार होऊन २०१९-२० चे निकष कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली. यावर मंत्री तोमर यांनी सकारात्मक चर्चा करीत राज्य सरकारला आदेश देऊन निकष पूर्ववत ठेऊ, अशी ग्वाही दिली. 

पानवेलीसाठी विशेष पॅकेज द्यावे 
जिल्ह्यातील पानवेल (विड्याची पाने) लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजतागायत शासनामार्फत कुणीही कुठलीही योजना अथवा मदत जाहीर झालेली नाही व मिळालेली नाही. लॉकडाउनच्या काळात शेतकरी भरडला गेलेला असून, पानवेलीसाठी विशेष पॅकेज अथवा योजना जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली. 

खतांचा सुरळीत पुरवठा 
जळगाव जिल्ह्यात रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा, तसेच ज्या वेळी शेतकरी खत खरेदी करतात, त्यावेळी आधार नोंदणीची प्रणाली सुरळीत व्हावी, ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्र जळगाव फार्मवर कृषी यांत्रिकीकरण संदर्भात अत्याधुनिक अवजार केंद्र उभारण्यात यावे. तसेच कृषी विज्ञान केंद्राची स्वतंत्र अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली नर्सरी निर्माण करण्यात यावी, या समस्या व मागण्यांबाबत उचित सहकार्य मिळावे, अशी विनंतीही श्री. महाजन आणि खासदार पाटील यांनी केली. या सर्व मागण्या तत्काळ आदेश देऊन मार्गी लावण्याची ग्वाही केंद्रिय कृषिमंत्री तोमर यांनी या वेळी दिली आहे.

संपादन : राजेश सोनवणे