
बँकेत कर्ज भरणा करताना शेतकऱ्यांनी एक दिवस जरी उशीर केला तरी बँक त्यावर व्याज आकारते आणि शेतकऱ्यांचे पैसे मात्र दीड महिन्यानंतरही परत मिळत नाहीत, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे.
-गिरीश नेहते, केळी उत्पादक शेतकरी, निंभोरा (ता. रावेर)
रावेर (जळगाव) : तालुक्यातील निंभोरा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील ११५ केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळी पीकविम्याची सुमारे ७५ लाख रुपयांची रक्कम तब्बल दीड महिन्यानंतरही मिळालेली नाही. ही रक्कम ७ डिसेंबरच्या आत सर्व संबंधित केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास स्टेट बँकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संतप्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.
निंभोरा, खिर्डी बुद्रुक, खिर्डी खुर्द, वाघाडी, धामोडी, कांडवेल, शिंगाडी, रेम्भोटा आदी गावांमधील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी निंभोरा येथील स्टेट बँकेच्या शाखेतून केळी पीकविमा काढला होता. अन्य सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ६६ हजार रुपयांप्रमाणे भरपाईची रक्कम मिळाली आहे. मात्र, ११५ पेक्षा जास्त शेतकऱ्यांना अजूनही ही रक्कम मिळालेली नाही. सुमारे दीड महिन्यापासून हे सर्व शेतकरी बँकेत हेलपाटे मारत आहेत. बँकेच्या की विमा कंपनीच्या तांत्रिक त्रुटींमुळे ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
दरम्यान, बुधवारी (ता. २) निंभोरा येथील सुनील कोंडे, गिरीश नेहेते, खिर्डीचे गिरीश ढाके, वाघाडीचे देवराम चौधरी आदी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापकांना निवेदन दिले. सर्व ११५ शेतकऱ्यांच्या खात्यात ७ डिसेंबरच्या आत केळी पीकविम्याची रक्कम जमा न झाल्यास बँकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या सर्व शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि निंभोरा पोलिस ठाण्याला देण्यात आलेल्या आहेत.
सुरक्षारक्षकांनी शेतकऱ्याला काढले बाहेर
निंभोऱ्याजवळील खिर्डी बुद्रुक येथील केळी उत्पादक शेतकरी मुरलीधर पाटील यांनीही निंभोरा येथील स्टेट बँकेच्या शाखेतून केळी पीकविमा काढला आहे. त्यांना एक लाख ३२ हजार रुपये पीकविमा नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ९९ हजार ९६० रुपये मिळणार आहेत. बँक शाखा व्यवस्थापकांच्या तांत्रिक चुकीमुळे रक्कम कमी मिळणार असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. मिळणार असेल ती रक्कम स्वीकारण्यास श्री. पाटील तयार आहेत पण ही कमी रक्कमही अजून मिळालेली नाही. या रकमेच्या चौकशीसाठी मंगळवारी (ता. १) बँकेत गेलो असता बँक व्यवस्थापकांनी बँकेच्या सुरक्षारक्षकांना बोलावून मला बाहेर काढले आणि पोलिसांना बँकेत बोलावून निंभोरा पोलिस ठाण्यात नेले, अशी कैफियत श्री. पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडली. आपण सर्व कागदपत्रांसह पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडल्यानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
संपादन ः राजेश सोनवणे