रावेर हत्‍याकांड प्रकरणी एकाला अटक

raver four child killed case
raver four child killed case


रावेर (जळगाव) : बोरखेडाजवळ आठवड्यापूर्वी झालेल्या चार आदिवासी बालकांच्या हत्याकांड आणि अल्पवयीन आदिवासी मुलीवरील बलात्काराच्या आरोपावरून पोलिसांनी केऱ्हाळा येथील एका युवकास अटक केली आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी 70 साक्षीदारांची सखोल चौकशी केली आणि 54 जणांचे जबाब नोंदविले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडून प्राप्त शवविच्छेदन अहवाल, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिक यांच्याकडील अहवाल आणि तांत्रिक व शास्त्रीय पुरावे तसेच घटनास्थळावरील परिस्थिती आणि पुरावे यांच्या आधारे महेंद्र सिताराम बारेला (वय १९, रा. केऱ्हाळा) यानेच हत्याकांड आणि लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिघही अल्पवयीन मुले घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर महेंद्र बारेलाने लैंगिक अत्याचार आणि हत्याकांड केल्याचे निष्पन्न झाले आहे. तरीही या प्रकरणी आणखी तपास पुढे सुरू असून तिघाही अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी अजूनही ताब्यात ठेवणार असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले.

घटनेची पूर्वपीठिका
रावेर शिवारात बोरखेडा रोडलगतच्या शेतात १६ ऑक्‍टोबरला सकाळी आठ वाजेच्या सुमारास शेत मालकांना शेतातील शेतमजुराचे घर बंद दिसले. त्यांनी आवाज दिला असताना घरातून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून आत प्रवेश केला असता त्यांना आतमध्ये १३ वर्षीय मुलगी, ११ वर्षीय मुलगा, ८ वर्षांचा मुलगा आणि ६ वर्षांची मुलगी अशा चारही मुलांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने गंभीर वार होऊन चौघे मरण पावलेल्या अवस्थेत दिसून आले. घटनास्थळावर एक लाकडी दांडा असलेली कुऱ्हाड रक्ताने त्याचे पाते माखलेले दिसून आली. म्हणून कोणीतरी अज्ञात मारेकऱ्यांनी चौघांना मारल्याची फिर्याद पोलिसांनी नोंद करून घेतली. शवविच्छेदन अहवालानंतर बलात्कार आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण या कलमांमध्ये ही वाढ करण्यात आली.

आठ दिवस रात्रंदिवस मेहनत  
१५ ऑक्टोबरच्या रात्री नऊच्या सुमारास झालेल्या या निर्घृण हत्याकांडाच्या आणि लैंगिक अत्याचाराच्या तपासासाठी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर पाच दिवस शहरात तळ ठोकून होते. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे हे आठ दिवसांपासून येथेच तपासकामी समन्वय ठेवून आहेत. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, तपास अधिकारी व भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी पवन कुमार चिंथा, धुळे येथील भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी पवन कुमावत, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम, रावेरचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह सुमारे ८० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी याप्रकरणाचा तपास रात्रंदिवस करीत होते. पोलिसांची फॉरेन्सिक टीम, श्वानपथक, ठसे तज्ज्ञ इतकेच नव्हे; तर पाल भागात सेवा देऊन निवृत्त झालेल्या काही पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचीही मदत या तपास कामी घेण्यात आली. जळगाव बरोबरच नंदुरबार, धुळे आणि नाशिक येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पाच पथके तपासकार्यात व्यस्त होती.

त्‍याने असा केला प्रकार
याबाबत पोलिसांनी घटनाक्रम सांगण्यास गोपनीयतेचा भाग म्हणून नकार दिला. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चौघेही मृत बालकांचा मोठा भाऊ संजय भिलाला याने आपल्या मित्रांना फोन करून घरी लक्ष ठेवण्यास सांगितले होते. त्यावरून गुड्डू उर्फ राज बारेला, मुकेश बारेला आणि सुनील सोळंकी हे 3 मित्र त्याच्या घरी पोहोचले.त्यांनी तिथे मद्यपानही केले व आपल्याच मित्राच्या बहिणीशी अतिप्रसंग करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र ते तेथून निघून गेल्यानंतर या तिघांपैकी मुकेशचा भाऊ असलेल्या महेंद्रने तिथे येऊन लैंगिक अत्याचार आणि हत्याकांड केले. यानंतर तो केऱ्हाळा येथे आपल्या गावी निघून गेला आणि तिथेच जेवण करून झोपून गेला. पोलिसांनी केलेल्या तपासात त्याच्या घरी कुऱ्हाड सापडल्याने त्याची कसून चौकशी झाली. फॉरेन्सिक विभागाच्या अहवालात त्यानेच बलात्कार केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे चौघेजण शहराबाहेर असलेल्या एका हॉटेलमध्ये काम करीत असल्याने भिलाला कुटुंब त्या दिवशी बाहेरगावी असल्याचे आणि चौघे मुलं घरी एकटे असल्याचे माहिती होते.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com