दुभाजकासाठी लाखोचा खर्च, आणि दुसरीकडे स्वातंत्र्यसैनिकांच्या नामफलकाकडे दुर्लक्ष  

प्रदीप वैद्य  
Sunday, 16 August 2020

रस्ता दुभाजकासाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या पालिदुभाजकात लावलेली झाडेही अस्ताव्यस्त वाढली आहेत. प्रशासनाने नामफलकाच्या सुशोभीकरणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.

रावेर : येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोविंदराव वैद्य मार्गावरील त्यांच्या नामफलकाची दुरवस्था झाली असून, त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. स्वातंत्र्यासाठी सश्रम तुरुंगवास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या नामफलकाकडे पालिकेने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

येथील रेल्वेस्थानक रस्त्याला लागून असलेल्या बारभाई जीनसमोर ‘ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोविंदराव वैद्य मार्ग’ असा नामफलक आहे. (कै.) वैद्य यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ पालिकेने या रस्त्याला त्यांचे नाव दिले. १९३६ आणि १९४२ मध्ये (कै.) वैद्य यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्याबद्दल १५ महिने सश्रम तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. धुळे आणि येरवडा (पुणे) येथील तुरुंगात त्यांनी ही शिक्षा भोगली होती. 
१९९८ मध्ये माजी विधानसभा अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाशचंद्र जोशी यांच्या हस्ते या रस्त्याचे नामकरण झाले होते. शहर व परिसरातील युवा पिढीला देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात रावेर शहराचे योगदान यानिमित्त समोर दिसत होते. मात्र, कालांतराने रस्त्याची उंची वाढली आणि रस्ता दुभाजक नवीन करण्यात आले. यामुळे आता रस्ता दुभाजकाची उंची या नामफलकापेक्षा जास्त झाली आहे. रस्ता दुभाजकासाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या पालिदुभाजकात लावलेली झाडेही अस्ताव्यस्त वाढली आहेत. प्रशासनाने नामफलकाच्या सुशोभीकरणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. रस्त्याने ये- जा करणाऱ्यांना आता नामफलक दिसतही नाही. 

ठराव करूनही दुर्लक्ष 
सुमारे पाच वर्षांपूर्वी पालिकेने या नामफलकाच्या दुरुस्तीबाबत सभेत ठराव करूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. याकडे मुख्याधिकाऱ्यांसह पदाधिकारीही सोयीस्करपणे डोळेझाक करीत आहेत. 

पालिकेला १५ दिवस संधी 
नामफलकाच्या दुरुस्तीसाठी आणखी १५ दिवस वाट पाहू. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हालापेष्टा सहन केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या नामफलकाची दुरवस्था ही खेदाची बाब आहे. पालिकेने ऑगस्टअखेर नामफलकाची दुरुस्ती न केल्यास स्‍वखर्चातून (कै.) वैद्य यांच्या त्याग आणि समर्पणाची आठवण राहण्यासाठी नामफलकाची दुरुस्ती करणार असल्याचे वैद्य कुटुंबीयांनी सांगितले. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver municipality ignores the nameplates of freedom fighters