त्या’ दुर्मिळ विटेची २७ वर्षांपासून पूजा...जागविल्या अयोध्येतील आठवणी !

प्रदीप वैद्य 
Wednesday, 5 August 2020

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ते जळगावला आले तेव्हा उत्तर महाराष्ट्रातील ज्या मोजक्या कार्यकर्त्यांचा सत्कार पंतप्रधानांच्या हस्ते झाला,.

रावेर : अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीत सुमारे २७  वर्षांपूर्वी झालेल्या कारसेवेदरम्यान येथील सीताराम रूपचंद लष्करे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने सोबत आणलेल्या  विटेची त्यांच्या घरी अजूनही रोज पूजा केली जाते. अयोध्येत रामजन्मभूमीत बुधवारी (ता. ५) श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन पार्श्वभूमीवर या विटेची घरगुती वातावरणात विशेष पूजा केली जाणार आहे. 

येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सीताराम लष्करे यांचे वडील रूपचंद लष्करे आणि आजोबा गणपत लष्करेही संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ते जळगावला आले तेव्हा उत्तर महाराष्ट्रातील ज्या मोजक्या कार्यकर्त्यांचा सत्कार पंतप्रधानांच्या हस्ते झाला, त्यात गणपत लष्करे यांचा समावेश होता. 

३ डिसेंबर १९९२ ला सीताराम लष्करे, प्रमोद महाजन, विलास पाटील, पांडुरंग महाजन, जगदीश महाजन, संजय पाटील, प्रकाश ऊर्फ बाळू रघुनाथ महाजन (फुलारी), संतोष महाजन, दिलीप इंगळे, संदीप महाजन हे सर्व युवक रेल्वेने अयोध्योत पोचले. ६ डिसेंबर १९९२ ला सकाळी साडेदहाच्या सुमारास कारसेवेला प्रारंभ झाला. त्या वेळी केवळ २२ वर्षे वय असलेले सीताराम लष्करे हेही थेट वादग्रस्त जागेवर चढले आणि कारसेवेत सक्रिय सहभाग घेतला. दुपारी चारपर्यंत कारसेवा पूर्ण झाली होती. या सर्व युवकांवर लष्कराने कारवाई करण्याच्या आतच तेथील आठवण म्हणून पडलेल्या बांधकामातील एक वीट सोबत घेऊन कार्यकर्ते रावेरमध्ये परतले होते. ही वीट प्राचीन राममंदिराची असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्या वेळी शहरात आल्यावर ठिकठिकाणी श्री. लष्करे यांनी सोबत आणलेल्या विटेची पूजा झाली होती. येथील स्वामी विवेकानंद चौकातील मरीमाता मंदिराजवळ असलेल्या त्यांच्या घरी आजही ही वीट देव्हाऱ्यात  असून, रोज अन्य देवतांबरोबर या विटेची पूजा केली जाते. 

अयोध्येला गेलेल्या युवकांपैकी पांडुरंग महाजन आणि संतोष महाजन यांचे निधन झाले आहे. अन्य युवक आपापल्या व्यवसायात आहेत. श्री. लष्करे त्या वेळच्या आठवणी सांगताना रंगून जातात. ही वीट कपड्यांमध्ये लपवून आणल्याने ठिकठिकाणी तपासणी होऊनही ती पोलिसांना सापडली नव्हती. 

आज विशेष पूजन 
अयोध्येत बुधवारी (ता. ५) दुपारी साडेबाराला श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होईल. त्याच वेळी सीताराम लष्करे यांच्या घरी त्यांनी अयोध्येतून आणलेल्या विटेचे पूजन होणार आहे. हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करण्याचा मनोदय होता, पण कोरोनामुळे साधेपणाने घरीच पूजन करणार असल्याचे श्री. लष्करे यांनी सांगितले. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver Worship of that rare brick for 27 years ‘Memories’ of awakened Ayodhya