कष्टाने स्वप्नाला गवसणी...शेतकऱ्याचा मुलगा झाला ‘आयएएस

विनोद सुरवाडे
Wednesday, 5 August 2020

शेतकरी असतानाही कठीण परिस्थितीतसुद्धा कांतिलाल याने आपले शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून आपण मोठे अधिकारी व्हायला हवे, असे त्याला वाटत होते. वडिलांजवळ तशी इच्छा बोलून दाखवली.

वरणगाव  : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (यूपीएससी) परीक्षेत कठोरा (ता. भुसावळ) येथील कांतिलाल सुभाष पाटील या शेतकऱ्याच्या मुलाने देशात ४१८ रँकने यश मिळवत मराठी झेंडा रोवला आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन कष्टाने स्वप्नाला गवसणी घातल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कांतिलालचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण तपत कठोरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. तर आठवी ते बारावीपर्यंत महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव येथे पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षण त्याने नाशिकच्या के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण करून पुणे येथे यूपीएससीची तयारी केली. मंगळवारी जाहीर झालेल्या २०१९ च्या यूपीएससी परीक्षेच्या निकालात देशात ४१८ रँकने उत्तीर्ण झाला आहे. वडील सुभाष पाटील, तसेच आई कल्पना शेतकरी असतानाही कठीण परिस्थितीतसुद्धा कांतिलाल याने आपले शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून आपण मोठे अधिकारी व्हायला हवे, असे त्याला वाटत होते. वडिलांजवळ तशी इच्छा बोलून दाखवली असता, वडिलांनी त्यास संमती दिली. ‘तुझ्यासाठी आम्ही मदत करायला तयार आहे’, असे सांगितल्यावर कांतिलालने पुण्यात गेल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. 

गावात आनंदोत्सव 
कांतिलालने दररोज आठ ते नऊ तास अभ्यास करून अपार कष्ट करत यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या परिसरातील यूपीएससी झालेला पहिलाच युवक असून, त्याच्य या यशाने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याच्या सत्काराचे नियोजनही करण्यात आले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार संजय सावकारे यांच्यासह अनेक नेते, अधिकारी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कांतिलाल याला शुभेच्छा दिल्या. 

भुसावळच्या अनिकेत देशात २८५ वा रँक 

भुसावळ येथील रहिवासी विनयकुमार आणि मंजूषा सचान यांचा मुलगा अनिकेत सचान याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरीसेवा परीक्षेत २८५ वा क्रमांक मिळविला आहे. शालेय जीवनापासूनच हुशार असलेल्या अनिकेतने दहावीत ९५ टक्के आणि केंद्रीय विद्यालय भुसावळमधून बारावीच्या परीक्षेत ९६.२ टक्के गुण मिळवले. यानंतर त्याने पहिल्या प्रयत्नात आयआयटी बीएचयू वाराणसीच्या विद्युत अभियांत्रिकी विभागात प्रवेश घेतला. वयाच्या २२ व्या वर्षी २०१९ मध्ये महाविद्यालय, तसेच यूपीएससी परीक्षेची तयारी करून यश मिळविले आहे. त्याचे वडील विनयकुमार सचन भुसावळ रेल्वेस्थानकात मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, त्याची बहीण आयुषी सचानसुद्धा एम्स दिल्लीहून एमबीबीएस करत आहे.  

 संपादन- भूषण श्रीखंडे  नेर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news varangaon The farmer’s son became ‘IAS