esakal | माणुसकी जिवंत आणि‌ मेलीही; मनोरूग्‍णाचा अखेर मृत्‍यू
sakal

बोलून बातमी शोधा

psychiatric parson death

दिवाळी उत्सव पर्वात वरणगाव पोलिसांनी मनोरुग्ण, बेवारस अशा व्यक्तींची स्वच्छता, नविन कपडे घालून त्यांना चांगली सन्मानपुर्वक वागणूक देण्याचा तर काही आजारींना वरणगाव ग्रामिण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याचा उपक्रम राबविला.

माणुसकी जिवंत आणि‌ मेलीही; मनोरूग्‍णाचा अखेर मृत्‍यू

sakal_logo
By
विनोद सुरवाडे

वरणगाव (जळगाव) : वरणगाव पोलिसांनी येथील एका मनोरुग्णाला उपचारार्थ दाखल केले. मात्र ग्रामिण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णाला सरकारी वाहनात जळगाव येथे रेफर करण्याच्या नावाखाली हरताळे शिवारात नेऊन टाकल्याची चर्चा आहे. यामुळेच त्‍या मनोरूग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍याचे बोलले जात असून संशयीतांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
दिवाळी उत्सव पर्वात वरणगाव पोलिसांनी मनोरुग्ण, बेवारस अशा व्यक्तींची स्वच्छता, नविन कपडे घालून त्यांना चांगली सन्मानपुर्वक वागणूक देण्याचा तर काही आजारींना वरणगाव ग्रामिण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याचा उपक्रम राबविला. यातीलच एका बेवारस 52 वर्षीय पुरुष मनोरूग्णाला पोलिसांनी आंघोळ व नविन कपडे घालून उपचारार्थ ग्रामिण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ. क्षितीजा हेंडवे यांच्या देखरेखखाली दाखल केले. 

अन्‌ त्‍याला काढले रूग्‍णालयाबाहेर
सदर रुग्ण पाच ते सहा दिवसांपासून उपचार घेत असतांना रूग्णालयात बेडवरच शौच व लघुशंका करू लागल्याने अस्वच्छता पसरवत होता. त्याला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाबाहेर काढले. अशक्त रुग्ण तीन दिवस थंडीत उपवासी व तहानलेल्या स्थितीत थंडीत कुडकुडत असल्याने येथील सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकिय अधिकारी हेंडवे यांना सांगितले. 

एकमेकांकडे दाखविले बोट
वैद्यकिय अधिकाऱ्यांनी वरणगाव पोलिस स्टेशनला पत्राद्वारे कळवत सदर रुग्ण दवाखान्याजवळ पडून आहे. त्याला जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात रवाना करावे लागत असल्याने पोलिस कर्मचाऱ्याची अवश्यकता आहे. परंतु पोलिसांनी या विषयाला नकार देत आमच्याकडे पोलिस कर्मचारी बळ कमी आहे; ते काम आमचे नाही. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासोबत संपर्क करा; असे त्यांनी देखील पत्राने उत्तर देऊन अंग काढून घेतले. परंतु यात त्या निष्पाप मनोरुग्‍णाचा काय दोष.ग्रामिण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारींनी १८ नोव्हेंबरला त्याचा रेफर रीपोर्ट तयार करून त्याला वरणगाव ग्रामिण रुग्णालयातून रवाना केले. 

तो मनोरूग्‍ण आढळला मृतावस्‍थेत
रूग्णाला जिल्‍हा रूग्‍णालयात पाठविण्याच्या दृष्‍टीने त्‍यास कोणत्या सरकारी वाहनाने जळगाव येथे रेफर केले; हे वैद्यकिय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना माहीत नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी तोच रुग्ण मुक्ताताईनगर पोलिस स्टेशन हद्दीत हरताळा शिवरात महामार्गाच्या पुलाखाली मृत अवस्थेत आढळून आला. तर ग्रामिण रुग्णालयातून मिळालेल्या पत्रात सदर रुग्ण पळून गेल्याचे लिहिले आहे. परंतु, रुग्ण अशक्त अधमेला असुन त्याला चालता किंवा बसता येत नव्हते. तर तो पळून गेलाच कसा? असा देखील प्रश्न उपस्थीत होत आहे. येथील सामाजिक संघटनांनी अशक्त रुग्ण जळगाव येथे रेफर केला. तर तो हरताळा येथे मृत अवस्थेत आढळला कसा? याकरीता मृत बेवारस व्यक्तीला न्याय मिळण्याच्या दृष्टीने मुक्ताईनगर तपासी पोलिस अधिकाऱ्यांनी योग्य तो तपास करून संशयीतांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image