‘पोखरा’ आहे नावाला, योजना नाहीत गावाला 

‘पोखरा’ आहे नावाला, योजना नाहीत गावाला 

वावडे (ता. अमळनेर)  : शेतकरी आत्महत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांना शेतीवर जोडव्यवसाय करता यावा, तसेच अवजारे आणि विहीर खोदण्यासाठी मदत मिळावी, यासाठी प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रिजीनल ॲग्रिकल्चर (पोखरा) प्रकल्प अर्थात राज्यात नानासाहेब कृषी संजीवनी प्रकल्प नावाने योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासह ट्रॅक्टर, शेततळे, फळबाग लागवड, वीजपंप, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, पाइपलाइन यांसह कित्येक योजनांचा लाभ उत्पादकाला मिळवता येईल, असे जाहीर करून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. अर्जप्रक्रिया पूर्ण झाली. योजनाही मंजूर झाली. काही शेतकऱ्यांना मंजुरीही मिळाली, अनुदान मिळाले; मात्र काही अनुदानाच्या, तर काही दोन वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. 

कृषिला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविल्या जात असलेल्या या योजनेत जीपीएस आणि वॉटरशेड मॅपच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गावांची निवड करण्यात आली होती. यात पहिल्या टप्प्यात दहा गावे, दुसऱ्या टप्प्यात तीन गावे आणि तिसऱ्या टप्प्यात २१ गावे आहेत, अशी एकूण ३४ गावे अमळनेर तालुक्यातील होती. योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन प्रस्ताव दाखल केले. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील १३ गावातील दोन हजार ३३७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले. त्यापैकी १,१३३ शेतकऱ्यांना साहित्य घेण्यासाठी पूर्वसंमती देण्यात आली. ४७९ शेतकऱ्यांनी साहित्य खरेदी केली, तर ३६२ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ऑनलाइन जमा करण्यात आले. तसेच ३० लाभार्थी प्रकरणे तपासणीसाठी विविध स्तरांवर अद्याप प्रलंबित आहेत. मात्र, कित्येकांचे प्रस्ताव अद्यापपर्यंत मंजूर झालेले नाहीत. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील २१ गावांमध्ये २६ जानेवारीपासून समिती स्थापन करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात आली. परंतु मार्चमध्ये कोविडचे आगमन झाल्याने शासनाच्या आदेशानुसार समिती बैठक स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील गावांमध्ये कोणालाही मंजुरी मिळालेली नाही. योजना सुरू होऊन तालुक्यात दोन वर्षे झाले तरीही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसल्याने सरकारची ही योजनादेखील कागदावरच राहणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

मंजूर स्थिती व शेतकरी संख्या 
ठिबक सिंचन : ५३ 
शेततळे अस्तरीकरण : एक 
पीव्हीसी पाइप : १४८ 
फळबाग लागवड : दोन 
ग्राम बीजोत्पादन : १२ 
शेळीपालन : दहा 
इलेक्ट्रिक मोटार : १३६ 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com