भरडधान्य खरेदी नोंदणीत घोळ; उद्‌घाटनानंतर काही क्षणातच तक्रार 

राजू कवडीवाले
Monday, 23 November 2020

शासकीय भरडधान्य खरेदी केंद्रासाठी अभिकर्ता म्हणून कोरपावली (ता. यावल) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मान्यता दिली आहे. शासकीय भरडधान्य खरेदीसंदर्भात गेल्या एक नोव्हेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने सुरवात केली.

यावल (जळगाव) : तालुक्यात सांगवी बुद्रुक येथे सोमवार (ता. २३) शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचे आमदार शिरीष चौधरी व आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमाच्या काही तासांतच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रचालक अभिकर्त्याविरोधात भरडधान्य खरेदी नोंदणीत घोळ केल्याबाबत तहसीलदार महेश पवार यांच्याकडे तक्रार अर्ज निवेदन स्वरूपात सादर केला आहे. 
तालुक्यात शासकीय भरडधान्य खरेदी केंद्रासाठी अभिकर्ता म्हणून कोरपावली (ता. यावल) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मान्यता दिली आहे. शासकीय भरडधान्य खरेदीसंदर्भात गेल्या एक नोव्हेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने सुरवात केली. परंतु झालेली नोंदणी ही अधिकृत शासकीय योजनेमार्फत न करता कोरपावली येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत केली गेली. परंतु नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधितांनी तत्काळ नोंदणी क्रमांक न देता कागदपत्रे घेऊन दुसऱ्या दिवशी नोंदणी क्रमांक दिला. त्यामुळे या नोंदणीमध्ये कोरपावली येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाने घोळ केलेला असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. विविध कार्यकारी सहकारी संस्थेने त्यांच्या जवळच्या लोकांची नावे आधी नोंदवून घेतली आहे. त्यामुळे ही नोंदणी तत्काळ रद्द करून प्रशासनामार्फत पुन्हा नव्याने नोंदणी करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, पंचायत समिती सदस्य तथा कॉंग्रेसचे गटनेता शेखर पाटील, अनिल प्रल्हाद पाटील, धीरज कुरकुरे, रमेश पाटील, अनिल महाजन, कदीर खान, जितेंद्र चौधरी, रहेमान तडवी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

तक्रारदार पदाधिकारीच कार्यक्रमात 
विशेष म्हणजे, रावेर मतदारसंघात यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे हे प्रथमच शासकीय भरडधान्य खरेदी कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते केंद्राचे उदघाटन झाले. मात्र, तक्रारबाबतच्या निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी बहुतेक पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. कोरपावली विविध कार्यकारी सहकारी संस्थेत बहुसंख्य संचालक भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news yawal complant coarse grain purchase registration