Marathi Rajbhasha Din : मराठी शाळांच्या संख्येत वाढ होण्याची गरज! इंग्रजी शाळांचे होतेय अतिक्रमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School

Marathi Rajbhasha Din : मराठी शाळांच्या संख्येत वाढ होण्याची गरज! इंग्रजी शाळांचे होतेय अतिक्रमण

जळगाव :

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी’

असा मराठा अभिमान बाळगणाऱ्या व अभिमानाची थोरवी सांगणाऱ्या कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते, लेखक, नाटककार कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस सोमवारी (ता. २७) मराठा राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली.

आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असलो, तरी मराठी भाषेचा ठेवा वृद्धिंगत करण्यासाठी व पुढील पिढीला देण्यासाठी हवे तसे प्रयत्न केले जात नाहीत. ज्याठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळा आहेत त्याठिकाणी सेमी इंग्रजी किंवा ‘सीबीएससी’ पटर्नच्या शाळा आणून मराठी भाषेला गौण स्थान देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जिल्ह्यात मराठी शाळांची निर्मिती होण्यासाठी शिक्षण विभागासह लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. (Marathi Rajbhasha Din need to increase number of Marathi schools Encroachment of English schools jalgaon news)

आपली मराठी भाषा खूप सुंदर आहे. मराठी भाषा महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे. आपल्या देशातील २२ अधिकृत भाषांपैकी मराठी भाषा एक भाषा आहे. जिल्ह्यासह महाराष्ट्रात मराठी शाळा बंद होऊन त्याठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्याचा फड काही वर्षांपासून सुरू आहे.

स्पर्धेच्या युगात शिक्षण घेताना इंग्रजी भाषा आली पाहिजे. मात्र, मराठी भाषाही मोठ्या प्रमाणात वापरली जाण्याची गरज आहे. मराठी ही महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती जपणारी भाषा आहे, म्हणूनच अनेक संतांनी मराठी भाषेचा उपयोग आपल्या जीवनात केला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ ‘मराठी’ भाषेतून लिहिला.

संत ज्ञानेश्वर महाराज मराठी भाषेबाबत सांगतात

माझा मराठीची बोलू कौतुके ।

परि अमृतातेहि पैजासी जिंके ।

ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन ।।

अनेक संतांनी ग्रंथांची रचना करून मराठीमध्ये भर घातली. संतांनी त्यांच्या साहित्यातून मराठी भाषेचा गौरव केला आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली. आपल्या देशातील कवी, लेखकांनी आपल्या लेखणीतून, तसेच कवितांमधून मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मातीचे रक्षण केल्यामुळे मराठी भाषा सुरक्षित झाली.

आपल्या देशातील भरपूर अनेक नामवंत याच मराठी मातीत घडले. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांसारखी अनेक यशस्वी व्यक्तिमत्त्व याच मराठी मातीत घडले.

मराठी राजभाषादिनी अनेक शाळांमध्ये भाषण व निबंध स्पर्धा, असे कार्यक्रम घेऊन मराठी भाषेचे महत्त्व मुलांना सांगितले जाते. मात्र, ते फक्त एका दिवसापुरते. पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेऊन देतात.

प्रत्येक पालकांना वाटते, की आपला मुलगा खूप शिकवा आणि चांगल्या नोकरीला लागावा. मात्र, दुसऱ्या भाषा शिकत असताना आपल्या मराठी भाषेचे महत्त्वही टिकून राहणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना मराठी भाषेचे महत्त्व सांगितले पाहिजे.

आपल्या देशात अनेक संत, कवींनी भरपूर ज्ञान आपल्याला दिले आहे, तेही आपण वाचले पाहिजे. आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे मराठी बोलण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे.

टिकेल की नाही याची चिंता करा!

शालेय समन्वयक प्रा. चंद्रकांत भंडारी यांचे मत

‘एकीकडे मराठी ज्ञानभाषा व्हावी, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असला, तरी दुसरीकडे प्राथमिक, माध्यमिक शाळांमधून (आणि महाविद्यालयांतूनही) ती ज्यारितीने (सेमी इंग्रजी माध्यमाद्वारे) हद्दपार होतेय, ती खरंच चिंताजनक बाब आहे.

ओस पडलेली ग्रंथालये, घटणारी वाचकसंख्या, पुस्तक विकत घेत वाचणाऱ्या वाचकांची रोडवणारी संख्या, हे चित्र पाहता आम्ही दर वर्षी का मराठी राजभाषा दिन साजरा करतो, असा प्रश्न पडतो.

यामुळे मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा सोडाच, ती टिकेल की नाही याची चिंता करण्याची वेळ आली आहे, असे मत येथील केसीई सोसायटीचे शालेय समन्वयक प्रा. चंद्रकांत भंडारी यांनी व्यक्त केले.

मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, की आज ‘प्युअर’ मराठी माध्यमांच्या शाळा ग्रामीण भागासह शहरी भागातील पालकांना नकोय. इंग्रजीस सीबीएससी शाळांचे प्रस्थ वाढतेय.

तिकडे चर्चा सुरू आहे मराठीला ज्ञानभाषा करण्याची. इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद केल्या पाहिजेत, असे म्हणणाऱ्यांनी २५-३० वर्षांत कधीही मराठी शाळा वाचविण्यासाठी ना लेखणी हातात घेतली, ना जनआंदोलन उभारले. ज्या ‘प्रयोगशील’ मराठा शाळा आहेत त्यांना भेटी देत प्रोत्साहन दिले जाते.

गप्पा फक्त २७ फेब्रुवारीला होतात. दुसरीकडे मराठी संस्कृती, भाषेचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अडेल हेशिश टेंबं, हॅन लॉन आणि रिचेल आदी परदेशी महिला कसून अभ्यास करतात, संशोधनाद्वारे मराठीत लिहितात, तेव्हा त्यांचे ‘मराठी प्रेम’ आम्ही कौतुकाने पाहतो आणि त्यावर इंग्रजीत बोलतो, लिहितो (केवढा हा विरोधाभास).

एकीकडे ‘बोलीभाषांना प्रोत्साहन द्या म्हणणारे, त्या जतन केल्या जाव्यात म्हणून स्टेजवर भाषण देणारे त्याच शाळा बंद करण्याचे आदेश देतात तेव्हा खरेच वाईट वाटते.