घोडेवाल्यांची व्यथा; मिरवणुकीची ‘शान’ तबेल्यात बंद 

घोडेवाल्यांची व्यथा; मिरवणुकीची ‘शान’ तबेल्यात बंद 

जळगाव  : लग्नाचा हा सीझनही वाया गेल्याने स्वत:च्या कुटुंबासह घोड्यांचा परिवार कसा पोसायचा? असा प्रश्‍न निर्माण झालांय.. कुटुंबातील सदस्यांसारखाच घोडेही ‘जिगर का टुकडा’ आहे त्यांना विकायचे कसे? असा आर्त सवाल चांदभाई घोडेवाले म्हणून प्रसिद्ध असलेले व्यावसायिक इकबालभाईंनी केला. 

कोणत्याही लग्नसोहळ्यात नवरदेवाचा थाट निर्माण करतो तो मिरवणुकीतील घोडा. भारदस्त घोडा, त्यावर रंगबिरंगी झालर, टाचांचा टपटप आवाज आणि सोबत बग्गी असेल तर त्या मिरवणुकीला वेगळा नूर चढतो आणि नवरदेवाचाही थाट वाढविणार ‘माहौल’ तयार होतो. पण, कोरोना व लॉकडाऊनमुळे सलग दुसऱ्या वर्षी लग्नसोहळे, समारंभांवर अवकळा आल्याने त्याचा फटका घोडेवाल्यांनाही बसला. 

१२५ वर्षांपासून सेवा 
जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात चांदभाई घोडेवाले नाव विख्यात आहे. चांदभाईंनी १९२५पासून केवळ एका घोड्यावर हा व्यवसाय सुरु केला. प्रामाणिक व विनम्रपणे सेवा केल्याने चांदभाईंचा हा व्यवसाय शतक गाठतोय. परंतु, या शतकात अशाप्रकारचे संकट कधी आल्याचे पाहिले नाही आणि वडिल, आजोबांकडून ऐकिवातही नाही. 

वर्षभरापासून काम नाही 
कोरोनाचा फटका सर्वच घटकांना बसला. त्यात लग्नसोहळ्यांची शान असलेल्या घोडा व्यवसायालाही लगाम बसला. वर्षभरापासून घोड्यांना आणि त्यांच्या मालकांच्या हातालाही काम नाही. चांदभाईंनी सुरु केलेले हे काम सध्या त्यांचा मुलगा इकबालभाई प्रमुख म्हणून पाहतात. जोडीला मुलं, पुतणे आहेत. मात्र, काम नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे त सांगतात. 

१५ घोडे, ४ बग्ग्या रिकाम्या 
चांदभाईंच्या तबेल्यात १५ घोडे आहेत. सोबतीला चार बग्ग्या आहेत. मात्र, वर्षभरापासून धंदा नसल्याने या घोड्यांनाही कसे पोसायचे हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. तबेल्यातील घोडे व खाली पडलेल्या बग्ग्या पाहून मन सुन्न होते, असे इकबालभाई सांगतात. 
 
एका घोड्यावर रोज ३०० रुपये खर्च 
चांदभाईंच्या तबेल्यात १५ घोडे आहेत. एकेका घोड्यावर किमान ३०० ते ४०० रुपये रोजचा खर्च होतो. याशिवाय, घोडा आजारी पडल्यावर उपचाराचा खर्च वेगळा. गाय, म्हशीप्रमाणे घोडा रवंथ करत नाही, त्याला हरभऱ्याचा अथवा अन्य खास चारा लागतो. त्यामुळे ,एवढा खर्च आता परवडेनासा झाला. पण, घोडाही परिवारातील सदस्य झालाय, त्याला विकताही येत नाही. काळीज कठोर करुन विकायचे ठरवले तर कुणी घ्यायलाही तयार नाही, अशी स्थिती असल्याचे इकबालभाई, अश्‍पाकभाई सांगतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com