Jalgaon Accident News : मर्सिडीजची दुचाकीला धडक 2 युवक ठार; एक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bus accident

Jalgaon Accident News : मर्सिडीजची दुचाकीला धडक 2 युवक ठार; एक जखमी

एरंडोल : जळगावकडून नाशिक येथे भरधाव जाणाऱ्या मर्सिडीज कारने दुचाकीला समोरून दिलेल्या धडकेत शेतातून घराकडे जाणारे दोन युवक जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीस जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात सोमवारी (ता. १६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राष्ट्रीय महार्गावरील पिंपळकोठा गावाजवळ झाला. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातानंतर मर्सिडीज चालक व अन्य दोन जणांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. रस्त्यावरून जाणाऱ्या काही प्रवाशांनी कारचालक व अन्य दोघांची जमावाच्या तावडीतून सुटका केली.

हेही वाचा: Jalgaon News: पोलिसांचे Landline नंबर निरुपयोगी; गेंदालाल मिलमध्ये संसारपसोगी साहित्य खाक!

नितीन जामसिंग पाटील (वय २५), घनश्याम भानुदास बडगुजर हे दोन युवक सोमवारी (ता. १६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीने घरी जात होते तर नारायण धनसिंग पाटील (वय २४) हा युवक रस्त्याच्या कडेने पायी शेतात जात होता. पिंपळकोठ्याजवळील नाल्याजवळ जळगाव येथून नाशिककडे भरधाव वेगाने येणाऱ्या मर्सिडीज कारने (क्रमांक एमएच १५, एचवाय ०७००) दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

मर्सिडीज कारने धडक दिल्यामुळे दुचाकीचे अक्षरश: तुकडे झाले आणि दुचाकीवरील नितीन पाटील व घनश्याम बडगुजर (दोन्ही रा. पिंपळकोठा) हे दोन युवक जागीच ठार झाले. तर रस्त्याच्या कडेने शेतात पायी जाणारे नारायण पाटील हे गंभीर झाले. अपघातानंतर जोरदार आवाज झाल्यामुळे पिंपळकोठा येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी जाऊन मदतकार्य सुरू करून जखमीस जळगाव येथे रवाना केले.

हेही वाचा: Jalgaon News : महसूल अधिकारी, कर्मचारी झाले कलावंत; सांस्कृतिक कार्यक्रमातून मिळविली दाद

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नाना महाजन, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच महेंद्र पाटील, रवींद्र तायडे, जुबेर खाटीक, धर्मेंद्र ताकूर, हेमंत घोंघडे यांनी अपघातस्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले आणि विस्कळित झालेली वाहतूक सुरळीत केली.

अपघातात मृत झालेले दोन्ही युवक अविवाहित होते. नितीन पाटील याचे पश्‍चात आई, वडील, भाऊ व विवाहित बहिण असा परिवार आहे तर घनश्याम बडगुजर याच्या पश्‍चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे.

हेही वाचा: Jalgaon Crime News : पाॅलिश करण्याच्या बहाण्याने लांबविले दागिने

गंभीर जखमी झालेल्या नारायण पाटील याचा ३१ तारखेला विवाह आहे. याबाबत गजानन बडगुजर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मर्सिडीज कारचालाकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी महेंद्र पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonaccidentdeath