रेल्वे प्रवाशाचे प्राण वाचविणार्‍या रणरागिणीच्या पाठीवर कौतुकाची थाप

दगडू पाटील | Wednesday, 30 December 2020

महिला आज सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून त्या धाडसातही मागे नाहीत. लताताईंनी हे पुन्हा एकदा सिध्द केले आहे.

धरणगाव : महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत असणार्‍या लता बन्सोले या मूळच्या अमळनेरकर रणरागिणीने नुकतीच जीवाची पर्वा न करता लोकल समोर पडलेल्या प्रवाशाचा प्राण वाचविल्याने त्यांचे कौतुक होत आहे. या पार्श्‍वभूमिवर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुंबईत त्यांना बोलावून त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला.

आवश्य वाचा-
 

मूळच्या अमळनेर येथील लता विनोद बनसोले या मुंबई येथे सुरक्षा दलात कार्यरत आहेत. गत शनिवारी सकाळी मुंबईतल्या ग्रँट रोड रेल्वे स्थानकावर असतांना त्यांच्या समोरील एक प्रवासी अचानक चक्कर येऊन रेल्वे ट्रॅकवर पडला. यातच समोरून वेगाने लोकल येत होती. यावेळी लताताईंनी आपल्या प्राणाची पर्वा न करता रेल्वे ट्रॅकवर उडी घेतली. त्यांनी तातडीने त्या व्यक्तीला बाजूला काढून समोरून येणार्‍या लोकलच्या चालकाला थांबण्याचा इशारा केला. यामुळे त्या लोकल चालकाने गाडी थांबविली आणि त्या इसमाचा प्राण वाचला.

Advertising
Advertising

पालकमंत्री केला सत्कार

लता बनसोले यांच्या या शौर्याचा व्हिडीओ राज्यभरात व्हायरल झाला असून त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, आपल्या जिल्ह्यातील एका भगिनीने हे धाडस दाखविल्याची दखल राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली. त्यांनी आज लता बन्सोले यांना मंत्रालयात बोलावून त्यांचा विशेष सत्कार केला.

आवर्जून वाचा- देवासारखे धावून आले डॉक्टर ; गरोदर महिलेला वेळेवर उपचार मिळाला म्हणून वाचले प्राण -

लता बन्सोले यांच्या धाडसाचे तोंड भरून कौतुक करत ना. पाटील यांनी त्यांच्या या शौर्याला वंदन केले. महिला आज सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून त्या धाडसातही मागे नाहीत. लताताईंनी हे पुन्हा एकदा सिध्द केल्याचे कौतुकोदगार त्यांनी काढले. तर त्या जळगाव जिल्ह्यातील असल्याने आपल्याला विशेष आनंद झाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहसंचालक भीमराव माधवराव कोरे व सुरक्षा पर्यवेक्षक प्रांजली जयप्रकाश जाधव यांची उपस्थिती होती.

 

संपादन- भूषण श्रीखंडे