esakal | नगरसेवक अपात्र प्रकरण; तीस हजार पानांचा अभ्यास कधी होणार? 
sakal

बोलून बातमी शोधा

नगरसेवक अपात्र प्रकरण; तीस हजार पानांचा अभ्यास कधी होणार? 

पक्षादेश उल्लंघन कायद्यांतर्गत सर्व नगरसेवकांना अपात्र करण्याची विनंती करणारी याचिका भाजपने दाखल केली.

नगरसेवक अपात्र प्रकरण; तीस हजार पानांचा अभ्यास कधी होणार? 

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : पक्षादेश धुडकावणाऱ्या २७ बंडखोर नगरसेवकांना अपात्र करण्याबाबत विनंती करणारी याचिका दाखल करताना भाजपने ३० हजार पानांची जंत्री विभागीय आयुक्तांकडे सादर केली असली तरी या जंत्रीचा अभ्यास केव्हा होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत असून, या संदर्भातील कारवाईबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या भूमिकेबाबत उत्सुकता लागून आहे. 

गेल्या महिन्यात १८ मार्चला महापौर निवडीच्या वेळी महापालिकेतील भाजपच्या ५७ पैकी २७ नगरसेवकांनी वेगळा पवित्रा घेत भाजप उमेदवाराविरोधात व शिवसेना उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. या नगरसेवकांनी पक्षाने बजावलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे पक्षादेश उल्लंघन कायद्यांतर्गत सर्व नगरसेवकांना अपात्र करण्याची विनंती करणारी याचिका गटनेते भगत बालाणी यांनी विभागीय आयुक्तांकडे नुकतीच दाखल केली. 

तीस हजार पानी कशी? 
याचिका दाखल करताना भाजपने बंडखोर २७ नगरसेवकांना बजावलेल्या पक्षादेशाची प्रत, ई-मेल, व्हॉट्स‌ॲप व घरावर डकविलेल्या आदेशाची प्रत, महापालिका अधिनियम, गटनोंदणी व त्या संदर्भातील तरतुदींचा उल्लेख असलेली अशी कागदपत्रे या याचिकेसोबत जोडण्यात आली आहेत. प्रत्येक नगरसेवकनिहाय सुमारे साडेचारशे ते पाचशे कागदपत्रे व अन्य असे हे ३० हजार पानांचे एकत्रित प्रकरण असल्याचे सांगण्यात येते. 

अभ्यास कधी होणार? 
विभागीय आयुक्तांकडे दाखल याचिकेसोबत ३० हजार पानांची जंत्री जोडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावर सुनावणी घेत असताना एवढ्या पानांचा अभ्यास कधी होणार? नगरसेवकांना नोटीस बजावणे, त्यांचे म्हणणे ऐकणे आणि दोन्ही बाजू ऐकल्यानंतर निर्णय देणे ही प्रक्रिया वेळकाढू होण्याची शक्यता अधिक आहे. 

असाही मतप्रवाह 
उलटपक्षी काही प्रमुख आणि महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे मर्यादित कागदपत्रे सादर करत याचिका दाखल केली असती तर त्याचा परिणाम लवकर मिळाला असता, असाही भाजपमध्ये एक मतप्रवाह आहे. त्यामुळे या याचिकेवरील कारवाईबाबत उत्सुकता लागून आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे