Jalgaon News : नशिराबाद- भागपूर रस्ता भिंत घालून बंद विमानतळ प्राधिकरणाची मनमानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

closed Nashirabad-Bhagpur road should be opened for traffic immediately

Jalgaon News : नशिराबाद भागपूर रस्ता भिंत घालून बंद विमानतळ प्राधिकरणाची मनमानी

नशिराबाद : नशिराबाद- भागपूर ग्रां. मा. क्रमांक १४२ हा अस्तित्वातील जुना पूर्वापार वहिवाटीचा गाव जोड रस्ता विमानतळ (Airport) प्राधिकरणाद्वारे मनमानी पद्धतीने बंद केला आहे. (Nashirabad Bhagpur road closed by wall arbitrariness of airport authority Jalgaon News)

यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गेल्या १० ते १५ वर्षांपूर्वी जळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नशिराबाद, भागपूर व कुसुंबा या शिवारातील शेकडो एकर जमीन संपादित झाली. या संपादनामुळे नशिराबाद भागपूर ग्रामीण मार्ग, नशिराबाद-उमाळा प्रस्तावित जिल्हा मार्ग व नशिराबाद- गुरचरण, असे तीन रस्ते विमानतळाच्या संपादित क्षेत्रात आल्यामुळे बाधित होणार आहेत.

नशिराबाद गावाचे महसूल शिवार विमानतळाच्या दक्षिणेकडे म्हणजेच उमाळा गावाकडे अंदाजे तीन ते चार किलोमीटरपर्यंत असल्याने सुमारे १००० ते १५०० एकर जमीन कसण्यासाठी नशिराबाद गावातील शेतकऱ्यांना दररोज ये-जा करावी लागते.

त्याचप्रमाणे प्रस्तावित जिल्हा मार्ग क्रमांक १८ हा यावल, शेळगाव, नशिराबाद, उमाळा ते पाचोरा, असा चार तालुके जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग आहे. या मार्गाने चारही तालुक्यांतून नागरिक, व्यापारी, शेतकरी दळणवळणासाठी दररोज ये- जा करीत असतात. या बंद होणाऱ्या तीनही रस्त्यांबाबत पर्याय काढण्यासाठी २०१२ मध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्यात संबंधित रस्ते बंद करताना ज्या १४ अटी ठरविण्यात आल्या होत्या, त्यात विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी मनमानी व अन्यायकारक पद्धतीने रस्ते बंद करू शकत नाही, असे ठरले होते.मात्र, या अटींचे उल्लंघन करत विमानतळ प्राधिकरणाने नशिराबाद- भागपूर रस्ता मनमानी पद्धतीने भिंत घालून बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकांचा हंगाम घेण्यासाठी शेतात ये-जा करण्यासाठी रस्ता नाही.

त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांमध्ये विमानतळ प्राधिकरणाविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. प्राधिकरणाने नशिराबाद- भागपूर रस्त्यावर अडसर म्हणून बांधलेली भिंत तत्काळ काढण्यासंबंधात विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना द्यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, शहराध्यक्ष प्रदीप बोढरे, भाजयुमोचे सरचिटणीस ललित बऱ्हाटे, शहराध्यक्ष किरण पाटील, गिरीश पाटील उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonAirport