Jalgaon PWD : शिवाजीनगर ‘टी’ पुलासाठी निधीच नाही; अधिकाऱ्याचे धक्कादायक उत्तर | officials of PWD gave information that there is no fund to construct Shivajinagar T shaped bridge in city jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PWD News

Jalgaon PWD : शिवाजीनगर ‘टी’ पुलासाठी निधीच नाही; अधिकाऱ्याचे धक्कादायक उत्तर

Jalgaon News : शहरातील शिवाजीनगर ‘टी’ आकारचा पूल तयार करण्यासाठी निधीच नसल्याची धक्कादायक माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेत झालेल्या बैठकीत दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. (officials of PWD gave information that there is no fund to construct Shivajinagar T shaped bridge in city jalgaon news)

शिवाजीनगरचा ‘टी’ आकाराचा पूल मंजूर करताना संपूर्ण पुलाची रक्कम मंजूर होती. मग टी आकारासाठी बाकी असलेला दहा ते १२ कोटींचा निधी गेला कुठे, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने शंभर कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्या निधीच्या नियोजनासाठी आमदार सुरेश भोळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर सोमवारी (ता. ८) बैठक झाली. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नवनाथ सोनवणे उपस्थित होते.

शिवाजीनगरातील नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे व नवनाथ दारकुंडे यांनी शिवाजीनगरातील ‘टी’ आकाराच्या पुलाच्या कामाबाबत प्रश्‍न उपस्थित केला. शिवाजीनगरातील पुलाच्या मुळ नकाशात ‘टी’ आकाराचा पूल होता. कोरोनामुळे पुलाच्या कामात दिरंगाई होत असल्यामुळे लवकर वाहतूक सुरू करण्यासाठी ‘वाय’ आकाराचा पूल तयार करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘टी’ आकारासाठी निधी शिल्लक असतानाही आता ‘टी’ आकाराचा पूल करण्यास विलंब का होत आहे, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की शिवाजीनगर पुलासाठी कोणताही निधी शिल्लक नाही. त्यामुळे ‘टी’ आकाराचा पूल तयार करण्याचा कोणताही प्रश्‍नच नाही. त्यांच्या या उत्तरामुळे संपूर्ण सभागृहच अवाक झाले.

मग निधी गेला कुठे?

याबाबत नगरसेवक नवनाथ दारकुंडे म्हणाले, की शिवाजीनगर पुलाला मंजुरी दिल्यानंतर ‘टी’ आकाराची डिझाईनही मंजूर झाली होती. त्यासाठी रक्कमही मंजूर झाली होती. मग अचानक निधी संपला कसा? ‘वाय’ आकाराच्या पुलाला किती निधी लागला हेही आता जनतेल सांगण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

बांधकाम विभागाचे मनपाला पत्र कसे?

‘टी’ आकाराचा पूल करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध नाही, याची माहिती या विभागाने कधीही दिलेली नाही. उलट ‘वाय आकाराचे काम झाल्यावर आम्हाला टी आकाराच्या कामासाठी टी. टी. साळुंखे चौकापर्यंचे अतिक्रमण काढून द्या’, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेला कसे दिले होते, याचे उत्तरही आता अधिकाऱ्यांनी देण्याची गरज आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक

शिवाजीनगरातील ‘टी’ आकाराच्या पुलासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली होती. त्यावेळी ‘आम्हाला अतिक्रमण काढून द्या’, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. आमच्याकडे कामासाठी निधी नसल्याचा उल्लेखही त्यांनी केलेला नाही. त्यामुळे आता या निधीसंदर्भात सर्वच खुलासा होण्याची गरज आहे.