
Jalgaon Crime News : तरुणाच्या खूनप्रकरणी एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
जामनेर (जि. जळगाव) : पहूर -सोनाळा शिवरस्त्यावर मंगळवारी (ता. २१) शिंगायत येथील तरुणाचा निर्घृण खून (Murder) झाल्याची घटना घडली होती. (One arrested by local crime branch in connection with youth murder jalgaon crime news)
या प्रकरणी गावातीलच एका तरुणाच्या जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळल्या. दारूच्या नशेत मंगळवारी (ता. २१) शिंगायत येथील प्रमोद उर्फ बाळू भगवान वाघ याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगाव विभागाचे रमेश चोपडे, सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे,
सहायक फौजदार युनूस शेख, पोलिस कर्मचारी महेश महाजन, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, किशोर राठोड, रणजित जाधव, सचिन महाजन ईश्वर पाटील, लोकेश माळी, रमेश जाधव यांच्या पथकाने अवघ्या २४ तासात शिंगायत येथील रवींद्र उर्फ बाळू भगवान हडप यांस शिंगायत येथून ताब्यात घेतले असून, उद्या त्यास जामनेर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात मृताचे काका सुभाष सुखदेव वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे तपास करीत आहेत.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
मद्यपींमध्ये झाला वाद
मारेकरी आणि मृत दोन्हीमध्ये परस्पर मित्रत्वाचे संबंध होते. दोघांनी दारू पिल्यावर वडापाववर ताव मारला. दारूच्या नशेत दोघांमध्ये शाब्दिक वाद उफाळला. वादाचे पर्यावसान भांडणात झाले. मृताने आरोपीस काठीने मारहाण केली. याचा राग येऊन रवींद्रने त्याच्या डोक्यात दगड घातला. यात प्रमोद रक्ताचा थारोळ्यात पडला.
घाबरलेल्या अवस्थेत रवींद्रने पुन्हा दोन घाव प्रमोदच्या डोक्यात घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मारेकऱ्याने १५ फूट अंतरावर मृतदेह फरफटत नेऊन त्याचा मोबाईल व मोटारसायकल घेऊन पलायन केले. आरोपीच्या मोबाईलमधील तांत्रिक लोकेशनवरून तपास पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.