Jalgaon Market Committee : सभापती निवडीसाठी ‘ईश्वरचिट्ठी’ चा पर्याय | Option of Ishwarachitthi for selection of Speaker Pachora Bhadgaon Bazar Committee Selection process on Monday Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Market Committee News

Market Committee News : सभापती निवडीसाठी ‘ईश्वरचिट्ठी’ चा पर्याय

Jalgaon News : पाचोरा -भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया सहकार निबंधकाच्या आदेशानुसार सोमवारी (ता. २२) होत असून, एकंदर राजकीय हालचाली व निवडणुकीनंतरची त्रिशंकू स्थिती पाहता सभापती निवड ईश्वरचिट्ठीने होण्याची शक्यता स्पष्ट होत आहे. त्यानुषंगाने राजकीय गरमागरमी कमालीची वाढली आहे.

पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी गेल्या २८ एप्रिलला ९८.२२ टक्के असे विक्रमी मतदान झाले होते. ३० एप्रिलला मतमोजणीची प्रक्रिया पार पडली होती.

या मतमोजणी प्रक्रियेवर पराभूत उमेदवारांपैकी काही पॅनलप्रमुखांनी आक्षेप घेतलेला असून, जिल्हा सहकार निबंधकाकडे तक्रारी दाखल आहेत. त्याच्या सुनावणीची प्रतीक्षा लागून आहे. (Option of Ishwarachitthi for selection of Speaker Pachora Bhadgaon Bazar Committee Selection process on Monday Jalgaon News)

बाजार समितीच्या निवडणुकीसाठीच्या मतमोजणीअंती आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलला ९, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ, शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी व राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वज्रमूठ पॅनलला ७ व अमोल शिंदे आणि सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित शेतकरी सहकार पॅनलला २ जागा मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने कोण कोणाला कशा पद्धतीने मदत करतो? व सभापती, उपसभापतीपदी कोण विराजमान होतो, याबाबतची खलबते कमालीची वाढली आहेत. महाविकास आघाडी व भाजप एकत्र आले तर त्यांचे बलाबल ९ होते. आमदार किशोर पाटील व भाजपचे अमोल शिंदे यांच्यातून विस्तवही जायला तयार नाही.

दोघांमधील ओढताण कमालीची वाढली आहे. राज्यस्तरावरील भाजप शिवसेना युतीच्या वरिष्ठ नेत्यांनी यात हस्तक्षेप करून दबावतंत्र वापरल्यास शिवसेना व भाजप एकत्र येतील व त्यांचे बलाबल ११ होईल. अथवा भाजपचे दोघे संचालक तटस्थ राहिले तरी आमदार किशोर पाटील यांच्या ९ बलाबल आधारे ते आपला सभापती विराजमान करू शकतील, असा अंदाज आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या संदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे ७ व भाजप प्रणित पॅनलचे २ असे ९ संचालक एकत्र येऊन आमदार किशोर पाटील यांच्यापुढे आव्हान उभे करतील व समसमान संचालकाच्या आधारे ईश्वरचिट्ठी काढून सभापती, उपसभापती निवडण्यात येईल, असे चित्र स्पष्ट होत आहे.

दरम्यान, या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेऊन पराभूत उमेदवारांसह पॅनलप्रमुखांनी जिल्हा सहकार निबंधकांकडे पुनर्मोजणी व चौकशीची मागणी करणारे अर्ज दाखल केले आहेत. त्या संदर्भात कोणतीही कार्यवाही अजून सुरू झाली नाही.

परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून विजयी झालेले शिवसेनेचे उद्धव मराठे यांना अपात्र करण्यात यावे, कारण गतकाळातील बाजार समितीतील अवाजवी खर्चाचा ठपका ठेवून त्यांचेवर सुमारे पाच लाख रुपये वसुलीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, असे असताना ते संचालक झाल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी याचिका शिवसेनेचे संचालक गणेश पाटील यांनी जिल्हा सहकार निबंधकांकडे केली आहे. परंतु उद्धव मराठे यांच्या संदर्भातील तक्रारींची अंतिम सुनावणी पूर्ण न झाल्याने त्यांचा सभापतीपदासाठी उमेदवारी करण्याचा मार्ग मोकळा झाला.

समसमान स्थिती झाल्यास...

आमदार किशोर पाटील यांच्यावतीने त्यांचे कट्टर समर्थक असलेले गणेश पाटील व बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवणारे गणेश पाटील हे सभापती पदासाठीचे उमेदवार असून, दुसरीकडे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाचे उद्धव मराठे हे देखील सभापतीपदासाठी उमेदवार आहेत.

त्यामुळे महाविकास आघाडीचे ७ व भाजप प्रणित शिंदे गटाचे २ असे ९ संचालक व आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे ९ संचालक अशी समसमान स्थिती निर्माण झाल्याने ईश्वर चिट्ठीच्या आधारे सभापती निवड प्रक्रिया होण्याची शक्यता सुस्पष्ट होताना दिसत आहे.

टॅग्स :Jalgaonmarket committee