Jalgaon KBCNMU News : पदोन्नतीसाठी पेपर सेटिंग, मूल्यांकनात सहभाग अनिवार्य | Participation in paper setting assessment is mandatory for teacher promotion kbcnmu jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University

Jalgaon KBCNMU News : पदोन्नतीसाठी पेपर सेटिंग, मूल्यांकनात सहभाग अनिवार्य

Jalgaon News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परीक्षांचे निकाल मुदतीच्या आत जाहीर करण्यासाठी तातडीची काही पावले उचलली आहेत. (Participation in paper setting assessment is mandatory for teacher promotion kbcnmu jalgaon news)

यात शिक्षकांच्या उन्नत अभिवृद्धी योजनेंतर्गत (CAS) पदोन्नतीचा लाभ मिळण्याबाबतचे प्रस्ताव दाखल करतानाच प्रस्तावासोब‍त पेपर सेटिंग किंवा उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाच्या कामकाजात सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

गेल्याच आठवड्यात राज्यपाल तथा कुलपतींनी विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे निकाल मुदतीच्या आत लावण्याबाबत सूचना दिल्या होत्या. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. १८) झाली.

तीत परीक्षांच्या निकालाबाबत चर्चा झाली. विद्यापीठाने मूल्यांकनासाठी पाठविलेल्या कार्यादेशाचे पालन न करता काही शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

असे ठरले बैठकीत

त्या अनुषंगाने परीक्षेच्या कामात विद्यापीठाच्या आदेशाचे पालन न करणे, ही बाब महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ मधील कलम ४८ (४) मध्ये नमूद तरतुदीचे उल्लंघन करणारी असून, ज्या शिक्षकांनी उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन कामात सहभाग नोंदविला नाही.

त्या शिक्षकांवर विद्यापीठाकडून कारवाई करण्यात येणार आहे, तसेच शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी (CAS) जे प्रस्ताव विद्यापीठात दाखल होतात. त्या प्रस्तावासोबत परीक्षाविषयक विशेषत: पेपर सेंटिग किंवा मूल्यांकनाच्या कामात सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्याचे ठरविण्यात आले.

आपल्या महाविद्यालयातील एकूण उत्तरपत्रिकांच्या १२० टक्के (विद्यार्थी संख्या x विषय x १.२) उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन शिक्षकांनी केल्याचे प्रमाणपत्र प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे पात्रता अर्ज, तसेच संलग्नता नूतनीकरणाचे प्रस्ताव दाखल करताना जोडणे आवश्यक राहील, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बैठकीला प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, अधिष्ठाता डॉ. अनिल डोंगरे, प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत, प्राचार्य डॉ. ए. पी. खैरनार, डॉ. साहेबराव भूकन, सहयोगी अधिष्ठाता डॉ. गिरीशकुमार पटनायक, प्राचार्य एस. डी. बऱ्हाटे, प्राचार्य डॉ. विजय बहिरम, प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, प्राचार्य डॉ. आय. डी. पाटील, प्रा. जयदीप साळी, प्रा. ए. एस. पाटील, प्रा. समीर नारखेडे, औरंगाबाद विद्यापीठाचे डॉ. गणेश मांझा, परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील आदी उपस्थित होते.