
जळगाव : अंचलवाडीतून चोरट्यांनी लंपास केले पोकलँड मशीन
अमळनेर : तालुक्यातील आंचलवाडी येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी आलेले १४ लाख रुपये किमतीचे पोकलँड मशीन चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बुधवारी (ता. २७) दुपारी साडेतीनच्या सुमारास उघडकीस आली असून, अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
लोंढवे ते आंचलवाडी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत शिवशक्ती कन्स्ट्रक्शनमार्फत सुरू होते. पाच महिन्यापासून हे काम सुरू होते. रस्त्याच्या कामासाठी पोकलँडचा वापर करण्यात येत होता. मात्र पावसाळा सुरू झाल्याने रस्त्याचे काम बंद करण्यात येऊन पोकलँड व इतर साहित्य आंचलवाडी या गावात ठेवण्यात आले होते. दरम्यान, २३ जुलैला दुपारी साडेतीनच्या सुमारास रोडरोलर त्या ठिकाणी लावण्यात आले होते. त्यावेळी त्या ठिकाणी पोकलँड सुद्धा लावलेले होते. मात्र, बुधवारी (ता. २७) दुपारी साडेतीनच्या सुमारास कामाचे सुपरवायझर त्या ठिकाणी गेले असता त्यांना पोकलँड दिसून आले नाही.
त्यांनी फोनवरून माहिती सांगितली असता घटनास्थळी पाहणी केली असता पोकलँड मुख्य रस्त्यापर्यंत जाणाच्या खुणा होत्या तर मुख्य रस्त्यावरून मशीन कुठे गेले ते दिसून येत नसल्याने सुमारे १४ लाख रुपये किमतीचे पोकलँड मशीन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लंपास केले. पोकलँड मालक राज नामदेव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे तपास करीत आहेत.