Jalgaon News : दुचाकी चोरांसोबत पोलिसांचे ‘साटेलोटे’; पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Three bikes seized by the police.

Jalgaon News : दुचाकी चोरांसोबत पोलिसांचे ‘साटेलोटे’; पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू

जळगाव : एरंडोलच्या लक्ष्मीनगरमधील शिक्षकाची (Teacher) दुचाकी चोरी प्रकरणात धुळ्यातील गॅरेजचालकास अटक झाली. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. (police involved with bike thief in case of theft of teacher bike jalgaon crime news)

या चोरी प्रकरणी धुळे पोलिस दलातील दोन आणि जळगाव गुन्हे शाखेतील दोन ,अशा चार कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असून, चोरट्यांसोबत पोलिसांनी साटेलोटे केल्याची चर्चा सुरू आहे. तपासात पोलिसाच्या भावालाही ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे.

एरंडोलचे शिक्षक संजय रमेश पाटील यांची दुचाकी (एमएच १९, बीएक्स ६५९२) ११ जुलै २०२० ला रात्री चोरट्याने चोरून नेली. संजय पाटील यांनी ही दुचाकी जळगावच्या अपना कार बाजारमधून सेकंड हॅण्ड खरेदी केली होती.

दाखल गुन्ह्याचा शोध घेताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे येथील चाळीसगाव रस्त्यावरील गॅरेजचालक जुबेद रशीद पठाण ऊर्फ बबलू पठाण याला अटक केली. अटकेनंतर त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने एरंडोल पोलिसांच्या स्वाधीन केले.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

बबलू पठाण याच्या ताब्यातून एक लाख २० हजार रुपयांच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संशयिताकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, उपनिरीक्षक शरद बागल तपास करीत आहेत.

"एरंडोल पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात धुळ्यातून गॅरेजचालकाला अटक केली आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या भावाला ताब्यात घेतले आहे. पोलिस कर्मचाऱ्याची नावे समोर आली असून, त्यात चौकशीअंतीच नेमका काय प्रकार आहे, हे सांगता येणार आहे." -किशन नजन पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव