जळगाव महापालिकेत अभद्र युतीचा महापौर 

जळगाव महापालिकेत अभद्र युतीचा महापौर 

जळगाव : राज्यात अभद्र युतीचे सरकार आहे. याच संस्कारातून जळगाव महापालिकेत अभद्र युतीचा महापौर झाल्याची टीका आमदार सुरेश भोळे यांनी केली. सत्तांतरामागे बोलविता धनी वेगळाच आहे, असेही ते म्हणाले. जळगाव मनपासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच रस घेतला असताना इतरांवर आरोप करणे चुकीचे आहे. 

आमदार म्हणून माझ्यावर किंवा गिरीश महाजन यांच्यावर लक्ष दिले नाही म्हणून आरोप करणे अयोग्य असून, आजपर्यंत आम्ही सर्व जाती-धर्माच्या नगरसेवकांना सेाबत घेऊन काम करण्याची आमची भूमिका राहिली आहे. आम्ही कधीच भेदभाव केला नाही. भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या वेळी माजी महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे- पाटील, गटनेता भगत बालाणी, कैलास सोनवणे, ॲड. शुचिता हाडा, डॉ. अश्‍विन सोनवणे, सुरेश सोनवणे, डॉ. राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी, दीपक साखरे उपस्थित होते. 

‘अमृत’मुळे रस्त्यांची कामे थांबून 
शहरात अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण योजनेचे काम सुरू आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतरच रस्त्यांची कामे करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत. त्या मुळे रस्त्यांची कामे रखडली आहे. परंतु शहरातील रस्त्यांसाठी ७० कोटींच्या कामांचा ठराव महासभेत झाला आहे. याबरोबरच गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेवर हुडकोचे कर्ज होते. जवळपास साडेचारशे कोटींमधून अडीचशे कोटी कर्ज तत्कालीन आमच्या सरकारने माफ केले आहे. जेडीसीसी बँकेचे कर्ज देखील ‘नील’ केले असल्याचेही भोळे यांनी सांगितले. 

नगरसेविकांविरुध्द याचिका दाखल करणार

बंडखोर नगरसेवक कोणाच्या विकासासाठी गेले ते सर्वश्रृत असून, या नगरसेवकांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. 

बाह्यशक्तीची ढवळाढवळ 
महापौर, उपमहापौरपदाची निवडणूकप्रक्रिया ही पूर्णतः बेकायदेशीर झाली आहे. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या निवडणुकीत सरिता माळी आणि सत्यजित पाटील यांच्यासह इतर बाहेरील लोक सहभागी झाले होते. या प्रक्रियेला भाजपची लेखी हरकत असतानाही पीठासीन अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावली आहे. निवडणूकप्रक्रियेत बाह्यशक्तीची ढवळाढवळ सुरू होती, असा आरोप नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी केला. पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत बंडखोर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई अटळ आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com