पुन्हा आगीत होरपळणार नाही म्हणजे मिळविलं ! 

पुन्हा आगीत होरपळणार नाही म्हणजे मिळविलं ! 

जळगाव ः अडीच वर्षांपूर्वी शहराने भारतीय जनता पक्षाच्या हाती महापालिकेची सूत्रे दिली. ‘वर्षभरात जळगावचा कायापालट करतो’ हे वचन मिळालं होतं.. जळगावकरांना वाटलं, निघालो आगीतून... अन्‌ पुढे अडीच वर्षांत हेच जळगावकर रस्त्यातील खड्ड्यांत अन्‌ खड्ड्यांतील फुपाट्यात जाऊन पडलेत... आता, ‘शहराचा विकास’ या गोंडस शब्दाच्या नावाखाली भाजपत बंडखोरी व त्यातून सत्तांतर झालं खरं, पण पुन्हा फुपाट्यातून निघून आगीत होरपळलो नाही, म्हणजे झालं... 

ऑगस्ट २०१८ मध्ये ज्यावेळी महापालिकेची निवडणूक झाली. त्यात तत्कालीन भाजप नेतृत्वाने जे ‘प्रयोग’ केले, त्याद्वारे महापालिकेत भाजपचीच सत्ता येणार हे सर्वश्रुत होते आणि झालेही तसेच.. ‘५० प्लस’ हे उद्दिष्ट ठेवत तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजनांनी ५७ चा करिश्मा करून दाखविला.. हा करिश्मा आणि त्यासाठी केलेले ‘प्रयोग’ किती प्रमाणात व किती दिवस यशस्वी ठरतात, हे पाहायचे होते. 

मनपातील राजकारण अस्थिर

अर्थात, या काळात २०१९ च्या अखेरपर्यंत चांगलं चाललं. राज्यात अनपेक्षितपणे सरकार बदललं आणि अन्य महापालिकांप्रमाणेच जळगाव पालिकेतील राजकारणही ‘अस्थिर’ बनलं. गेल्या सव्वा वर्षात या अस्थिरतेचा प्रत्यय काहीवेळा आलाही.. पण, महिला महापौर असल्याने अविश्‍वास ठरावाचा प्रश्‍नच नव्हता, म्हणून महापौर निवडीपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणारच होती. ती प्रतीक्षा संपली आणि अखेर अपेक्षेप्रमाणे महापालिकेत पूर्ण बहुमतातील भाजप अल्पमतात व विरोधी शिवसेना पुन्हा सत्तेत, असे चित्र स्पष्ट झाले. 

नेतृत्व कुणी केले?

आता या नाट्यात जे २७ सदस्य भाजपतून बाहेर पडले, त्यांचे एकमुखी नेतृत्व कुणी केले? असा प्रश्‍न केला, तर त्याचे उत्तर सध्यातरी कुणाकडे नाही, असूही शकत नाही. कारण या २७ जणांमध्ये किमान पाच वेगवेगळे गट आहेत. अशावेळी ही संख्या जेव्हा ५७ होती, तेव्हा भाजपत दहा गट असणे स्वाभाविक आहे, आणि ते या अडीच वर्षांत दिसूनही आले. त्यामुळे बंडखोरी करून बाहेर पडलेल्या सदस्यांनी अथवा त्या-त्या गटाच्या प्रमुखांनी शहराचा विकास, आमदारांचा कारभार अशी कारणे दिली तरी, त्यामागचे ‘अर्थ’कारण न समजण्याइतके जळगावकर (हतबल असले तरी) मूर्ख नक्कीच नाहीत. ज्या सदस्यांना कुठल्याही पक्ष, वृत्ती, व्यक्तिनिष्ठेचे अधिष्ठानच नाही ते भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अथवा कुठल्याही पक्षाकडून लढले तरी, त्याने केवळ अशाप्रकारचे सत्तांतर होण्यापुरता तेवढा फरक पडतो.. 

सत्तांतराने फरक पडणार का?
प्रश्‍न उरतो, तो जळगावचा व जळगावकरांच्या जीवनमानातील फरकाचा. त्यांच्या दैनंदिन जगण्यावर या सत्तांतराने फरक पडणार का? याचे उत्तर ना सत्ता गमावलेल्या भाजपकडे आहे ना १७ व्या मजल्यावर कार्यालय थाटणाऱ्या नवनिर्वाचित महापौर, उपमहापौरांकडे... अगदी या नाट्यावरून ज्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली जाताहेत, त्या विनायक राऊत, एकनाथ शिंदे यांच्याकडेही नाही. आणि हो, जाता जाता.. निवडणुकीदरम्यान ‘मनी-मसल पॉवर’ असली तरी कुणाला व किती प्रमाणात जवळ करावं... अन्‌ आपल्यांना किती दूर करावं, याचा थोडा तरी धडा अशा उदाहरणांमधून भाजप नेतृत्वानं घेतला तरी पुरेसं..! 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com