Turmeric Cultivation : खानदेशात हळद लागवडीची पूर्वतयारी सुरू | Preparation for planting turmeric in Khandesh jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

turmeric

Turmeric Cultivation : खानदेशात हळद लागवडीची पूर्वतयारी सुरू

Jalgaon News : हळद हे कधी काळी खानदेशातील पीक होईल, असे वाटत नव्हते. मात्र, आता खानदेशात हळद लागवडीचे क्षेत्र वाढू लागले आहे. (Preparation for planting turmeric in Khandesh started jalgaon news)

सध्या बियाणे (बेणे) निवड सुरू असून साधारणतः मे महिन्याच्या अखेर त्याची लागवड होईल, असे चित्र परिसरात दिसून येत आहे. त्यादृष्टीने हळद लागवडीची पूर्वतयारी सुरु झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून चोपडा, रावेर, शहादा, चाळीसगाव, यावल, शिरपूर, शिंदखेडा आदी भागात हळद पीक वाढू लागले आहे. खरिपाच्या सुरुवातीला लागवड होणाऱ्या हळद पिकाच्या बियाण्याची पूर्व तयारी करण्याची लगबग या सर्व भागात सध्या सुरु झाली आहे.

त्यासाठीचे बॉयलर आणि अन्य यंत्रसामुग्री अनेक शेतकऱ्यांनी घेतली असून पीक घेतल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून अनेक भागातील शेतकरी आणि त्यांच्या गटांनी हळद पावडर विक्री करणेही सुरू केले आहे.

गट्टू आणि फिंगर बियाणे

सर्वसाधारणपणे हळदीचे बियाणे दोन प्रकारचे वापरतात. गट्टू बियाणे थोडेसे गोल स्वरूपातील असते व त्याच्या लागवडीतून अधिक उत्पादनाची अपेक्षा केली जाते. तर फिंगर लागवडीत थोडे उत्पादन कमी येते. एकरी बियाणे गट्टू १२ क्विंटल तर फिंगर ७ क्विंटल लागते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

हळद पिकवून ती बॉयलर केली जाते. १०० क्विंटलपासून साधारणतः २० ते २२ क्विंटल हळद मिळते. जी सांगली बाजारात विक्री केली जाते. खानदेशात जवळपास ५ हजार एकर क्षेत्रावर हळद घेतली जाते. त्यात रावेर तालुका अधिक लागवडीचा दिसून येतो.

हळदीचे गुणधर्म

आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमीनाशक आम्लपित्तहारक, भूक उद्दीपीत करणारी आहे. हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो तसेच ती रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे. पायावर सूज आल्यास हळद, गुळ व गोमुत्र गरम करून पितात. डोळ्यांच्या विकारावर हळकुंड तुरीच्या डाळीत शिजवून डोळ्यात अंजन करतात.

डाळीच्या पिठामध्ये थोडी हळद, थोडा पिसलेला कापूर व ४ ते ५ थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग, खाज थांबून पूर्ण अंगकांती सुधारते. हळदीचे धार्मिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. धार्मिक कार्यक्रमात तसेच हळदीपासूनचे कुंकू, हळद, लग्नकार्य, पूजा, भंडारा, सौंदर्य प्रसाधने व अनेक पोषक घटक तयार करतात.

टॅग्स :JalgaonTurmeric