Jalgaon Bribe Crime : बांबरुड तलाठी कार्यालयात लाच घेताना ‘पंटर’ला अटक | private person arrested while taking bribe in Bambrud Talathi office jalgaon bribe crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Bribe News

Jalgaon Bribe Crime : बांबरुड तलाठी कार्यालयात लाच घेताना ‘पंटर’ला अटक

Jalgaon News : पीक कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाचा बोजा सात-बारा उतारावर घेण्यासाठी १ हजार ३६० रुपयांची लाच घेणाऱ्या खासगी पंटरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. (private person arrested while taking bribe in Bambrud Talathi office jalgaon bribe crime news)

तलाठी कार्यालयाबाहेरच खासगी पंटरला लाच घेताना अटक झाल्याने महसुल विभागात खळबळ उडाली आहे. भगवान दशरथ कुंभार (वय ४४, रा. बांबरुड, ता. पाचोरा) असे या पंटरचे नाव आहे.

राणीचे बांबरुड येथील तक्रारदार शेतकऱ्याचे लासगाव शिवारात आईच्या नावाने शेत आहे. आईच्या नावे सामनेर येथील बँक ऑफ बडोदा शाखेत पीक कर्ज म्हणून १ लाख ३० हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. त्याचा बोजा शेत जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार हे बांबरुड तलाठी कार्यालयात गेले होते.

या वेळी खासगी पंटर भगवान कुंभार याने सांगितले की, माझे तलाठी आप्पांचे चांगले संबंध आहेत. तुमच्या आईच्या नावे मंजूर झालेल्या कर्जात पीक कर्जाचा बोजा उताऱ्यावर लावण्याचे काम तलाठी यांच्याकडून आणून देतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यासाठी त्याने १ हजार ३६० रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी जळगावच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

खातरजमा झाल्यावर पोलीस उपाधीक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकातील श्रीमती एन. एस. जाधव, पोलीस नाईक ईश्‍वर धनगर, राकेश दुसाने, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, सुनील पाटील, रवींद्र घुगे, पोलीस नाईक जनार्दन पाटील, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने सापळा रचून, कुंभार याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Jalgaoncrimebribe